पोलीस घेणार ज्येष्ठांच्या सुरक्षेची काळजी

By Admin | Updated: June 14, 2015 01:50 IST2015-06-14T01:50:43+5:302015-06-14T01:50:43+5:30

एकटे राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेचा भेडसावणारा प्रश्न गांभीर्याने घेत पोलिसांनी एक पाऊल पुढे टाकले आहे.

Care for the security of the senior citizens of the police | पोलीस घेणार ज्येष्ठांच्या सुरक्षेची काळजी

पोलीस घेणार ज्येष्ठांच्या सुरक्षेची काळजी

नवी मुंबई : एकटे राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेचा भेडसावणारा प्रश्न गांभीर्याने घेत पोलिसांनी एक पाऊल पुढे टाकले आहे. शहरातील ज्येष्ठांची माहिती संकलित करून एकटे राहणाऱ्या ज्येष्ठांवर स्थानिक पोलिसांमार्फत विशेष लक्ष ठेवले जाणार आहे.
लुटीच्या उद्देशाने ज्येष्ठांवर हल्ले होण्याचे प्रकार मुंबईसह नवी मुंबईत देखील घडू लागले आहेत. वाशीमध्ये दरोडेखोरांच्या हल्ल्यात एका ज्येष्ठ नागरिकाचे प्राणदेखील गेलेले आहेत. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. याचीच दखल घेत नवी मुंबई पोलिसांनी ज्येष्ठांच्या सुरक्षेकरिता पाऊल उचलले आहे. त्याकरिता शहरातील ज्येष्ठ नागरिकांची माहिती संकलित केली जात असल्याचे गुन्हे शाखा उपआयुक्त सुरेश मेंगडे यांनी सांगितले. हे काम अंतिम टप्प्यात असून ज्येष्ठ नागरिक संघटनांशी देखील संपर्क साधला जात असल्याचे ते म्हणाले. ज्येष्ठांची माहिती जमवत असताना एकटे राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांचीही विशेष नोंद केली जाईल. अशा ज्येष्ठांच्या सुरक्षेवर विशेष भर दिला जाणार असून स्थानिक पोलीस ठाण्याचे कर्मचारी त्यांच्या संपर्कात राहणार आहेत. जर या ज्येष्ठांना काही समस्या असल्यास त्या देखील सोडवण्याचा प्रयत्न पोलिसांमार्फत केला जाणार आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना सुरक्षा मिळून त्यांचीही भीती दूर होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Care for the security of the senior citizens of the police