‘क्यार’, ‘महा’मुळे अरबी समुद्र खवळला; महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर मुसळधार पाऊस पडणार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2019 02:07 AM2019-11-01T02:07:16+5:302019-11-01T06:29:51+5:30

मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात १ नोव्हेंबरपर्यंत हलका ते मध्यम पाऊस सुरूच राहील.

'Car', 'Maha' caused the Arabian sea to sink; There will be torrential rains along the coast of Maharashtra | ‘क्यार’, ‘महा’मुळे अरबी समुद्र खवळला; महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर मुसळधार पाऊस पडणार

‘क्यार’, ‘महा’मुळे अरबी समुद्र खवळला; महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर मुसळधार पाऊस पडणार

googlenewsNext

मुंबई : अरबी समुद्रात कमी दाबाच्या क्षेत्रामुळे निर्माण झालेल्या ‘क्यार’ चक्रीवादळाचा कोकण किनारपट्टीला तडाखा बसला असतानाच आता पुन्हा एकदा अरबी समुद्रातच कमी दाबाच्या क्षेत्रामुळे नव्याने निर्माण झालेले ‘महा’ चक्रीवादळ वेगाने पुढे सरकत आहे. एकाचवेळी अरबी समुद्रात घोंगावत असलेल्या दोन चक्रीवादळांमुळे समुद्र खवळलेला असून, हवामानातही उल्लेखनीय बदल होत आहेत.

चक्रीवादळाचा परिणाम म्हणून खोल समुद्रात उतरलेल्या नौकांना परतीचे संदेश देण्यात आले असून, गोव्यासह महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर ४८ तासांत मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. भारतीय हवामान शास्त्र विभागाच्या माहितीनुसार, लक्षद्वीप आणि लगतच्या दक्षिण-पूर्व अरबी समुद्रावर ‘महा’, तर पश्चिम-मध्य अरबी समुद्रावर ‘क्यार’ हे चक्रीवादळ आहे. गेल्या २४ तासांत मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडला आहे. कोकण, गोव्यात हवामान कोरडे नोंदविण्यात आले.

कोकण, गोवा, विदर्भाच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. मध्य महाराष्ट्राच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय वाढ झालीे. विदर्भाच्या काही भागात व मध्य महाराष्ट्राच्या उर्वरित भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली. कोकण, गोवा, मराठवाड्यात काही भागात तर विदर्भाच्या उर्वरित भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास नोंदविण्यात आले आहे.

चक्रीवादळाचा प्रभाव ४ नोव्हेंबरपर्यंत
‘महा’ हे चक्रीवादळ लक्षद्वीप क्षेत्र व नजीकच्या दक्षिण-पूर्व अरबी समुद्रात सक्रिय झाले आहे. या चक्रीवादळाचा प्रभाव ४ नोव्हेंबरपर्यंत राहील. हे चक्रीवादळ उत्तर-उत्तरपश्चिम दिशेने ताशी २२ किलोमीटर या वेगाने पुढे सरकत आहे. परिणामी, खोल समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या मासेमारी नौकांना परत बंदरात तत्काळ बोलाविण्यात येत आहे.

सद्य:स्थितीत किती नौका समुद्रात मासेमारीसाठी गेल्या आहेत त्याची माहिती मुख्य कार्यालय, प्रादेशिक कार्यालय व नजीकच्या तटरक्षक दल कार्यालयास त्वरित द्यावी, असेही मत्स्य विभागाने आपल्या संदेशात म्हटले आहे. मच्छीमारांना चक्रीवादळाची माहिती देत त्यांना त्यांच्या मासेमारी नौका सुरक्षित नजीकच्या बंदरात आणण्यासाठी प्रवृत्त करावे. जेणेकरून मच्छीमारांचे नुकसान होणार नाही, असे प्रशासनाने म्हटले आहे.

‘बुलबुल’ या चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता
मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात १ नोव्हेंबरपर्यंत हलका ते मध्यम पाऊस सुरूच राहील. पुणे शहरात शुक्रवार व शनिवार असे दोन दिवस गडगडाटासह विखुरलेला पाऊस राहण्याची शक्यता आहे. चक्रीवादळांमुळे राज्यात आॅक्टोबरमध्ये असामान्य पाऊस पडला आहे. तर, पश्चिम बंगालच्या उपसागरात आणखी एक कमी दाबाचे क्षेत्र पुढील चार ते पाच दिवसांत निर्माण होण्याची शक्यता आहे़ पुढे त्याचे ‘बुलबुल’ या चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता आहे़

मुंबईतही पावसाचा जोर वाढणार
‘क्यार’ आणि ‘महा’ या चक्रीवादळांमुळे किनारपट्टीवरील भागात पाऊस होत आहे.
दक्षिण कोकण आणि गोवा येथे पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.
रत्नागिरी, सिंधुदुर्ग, वेंगुर्ला, हर्णे येथे ४८ तासांत पाऊस पडण्याची शक्यता आहे.
३०-४० किमी प्रतितास वेगाने वारे वाहतील. दोन ते तीन दिवस समुद्र खवळलेला राहील.
मुंबईतही पावसाचा जोर वाढेल. १ नोव्हेंबरच्या सुमारास हलका पाऊस होईल.
पावसामुळे तापमान २ ते ३ अंश सेल्सिअसने कमी होईल, असे हवामान विभागाने सांगितले.

एकाच वेळी दोन चक्रीवादळे ही ऐतिहासिक घटना
अरबी समुद्रात एकाचवेळी उठलेली ‘क्यार’, ‘महा’ ही दोन चक्रीवादळे म्हणजे ऐतिहासिक घटनाच असल्याचे हवामान खात्याचे म्हणणे आहे. त्यांनी चक्रीवादळासंदर्भात गेल्या १२५ वर्षांची माहिती तपासली असून, १२५ वर्षांत अशी कोणतीच घटना घडली नसून तशी नोंद नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

Web Title: 'Car', 'Maha' caused the Arabian sea to sink; There will be torrential rains along the coast of Maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.