कागदपत्रे जमविताना उमेदवारांची दमछाक; मालमत्ता कर, बिलांच्या ‘ना-हरकत’साठी हेलपाटे
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2025 10:05 IST2025-12-25T10:05:23+5:302025-12-25T10:05:56+5:30
उमेदवारांची नावे जाहीर झाल्यानंतर घाईगडबड टाळता यावी, यासाठी कागदपत्रे आधीच जमा करून ठेवण्याचा सल्ला पक्षांनी दिला आहे. त्यामुळे संभाव्य उमेदवार पालिका कार्यालये व पोलिस मुख्यालयाचे फेरे मारताना दिसत आहेत. तसेच ते कागदपत्रांच्या पडताळणीसाठी वकिलांची ही मदत घेत आहेत.

कागदपत्रे जमविताना उमेदवारांची दमछाक; मालमत्ता कर, बिलांच्या ‘ना-हरकत’साठी हेलपाटे
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला मंगळवारपासून सुरुवात झाली. राजकीय पक्षांनी उमेदवारांची घोषणा केलेली नसली तरी संभाव्य उमेदवारांना अर्ज दाखल करण्यासाठी लागणारी सर्व कागदपत्रे आधीच तयार ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे उमेदवारांची अर्ज भरण्यासाठी शपथपत्र, स्वयंघोषित प्रमाणपत्रे तसेच पालिकेचे ना-हरकत परवाने यांची जमवाजमव करण्यासाठी धावाधाव सुरू झाली आहे.
उमेदवारांची नावे जाहीर झाल्यानंतर घाईगडबड टाळता यावी, यासाठी कागदपत्रे आधीच जमा करून ठेवण्याचा सल्ला पक्षांनी दिला आहे. त्यामुळे संभाव्य उमेदवार पालिका कार्यालये व पोलिस मुख्यालयाचे फेरे मारताना दिसत आहेत. तसेच ते कागदपत्रांच्या पडताळणीसाठी वकिलांची ही मदत घेत आहेत.
नवीन उमेदवारांपुढे अनेक अडथळे
महापालिका निवडणूक पुन्हा लढविणाऱ्यांना कागदपत्रे सादर करताना फारशी अडचण येत नाही. मात्र, प्रथमच निवडणूक लढवणाऱ्या इच्छुक उमेदवारांना आवश्यक कागदपत्रे मिळवताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. उमेदवारांना कागदपत्रे मिळवताना अडचण येऊ नये, यासाठी पालिकेने प्रत्येक वॉर्डात स्वतंत्र हेल्प डेस्क सुरू केले असून, तेथे अधिकारी नेमले आहेत.
पालिकेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, अर्ज स्वीकारताना निवडणूक अधिकारी कागदपत्रांची तपासणी करतात. ती अपूर्ण असल्यास त्याची माहिती तत्काळ उमेदवारांना दिली जाते, त्यामुळे अर्जात त्रुटी राहण्याची शक्यता कमी होते.
अर्ज भरताना आवश्यक कागदपत्रे
उमेदवारांना अर्जासोबत एकूण १३ कागदपत्रे सादर करावी लागतात. त्यात उमेदवारी अर्ज, राजकीय पक्षाचा ‘एबी फॉर्म, अडीच हजार हजार रुपये किंवा पाच हजार रुपयांची अनामत रकमेची पावती.
निवडणूक खर्चासाठी उघडलेल्या बँक खात्याचे स्वाक्षरीत विवरणपत्र, निवडणूक प्रतिनिधीचे नियुक्तीपत्र, उमेदवाराच्या कार्यालय व निवासस्थानाचा पत्त्याचा पुरावा, रंगीत पासपोर्ट साईज चार छायाचित्रे, मतदार यादीतील नावाचा पुरावा, जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र, शौचालय वापर प्रमाणपत्र, उमेदवार कोणताही कंत्राटदार नसल्याचे प्रमाणपत्र, मालमत्ता कर व पाणी बिल थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र. पोलिस चरित्र प्रमाणपत्र.
याशिवाय उमेदवाराला गुन्हेगारी पार्श्वभूमीची माहिती, बँक शिल्लक, स्थावर मालमत्ता, कुटुंबीयांची माहिती यांचा तपशील असलेले प्रतिज्ञापत्र (ॲफिडेव्हिट) अर्जासोबत सादर करणे बंधनकारक आहे.