उमेदवारांना शपथपत्रात आता उत्पन्नस्रोत, तपशील अनिवार्य; निवडणूक आयोगाचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2018 11:39 PM2018-08-18T23:39:57+5:302018-08-19T06:42:25+5:30

स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी शपथपत्रात उल्लेख हवा

Candidates now produce the affidavit, details are mandatory; Election Commission Order | उमेदवारांना शपथपत्रात आता उत्पन्नस्रोत, तपशील अनिवार्य; निवडणूक आयोगाचे आदेश

उमेदवारांना शपथपत्रात आता उत्पन्नस्रोत, तपशील अनिवार्य; निवडणूक आयोगाचे आदेश

Next

- विशेष प्रतिनिधी 

मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी उमेदवारी अर्जांसोबत सादर करावयाच्या शपथपत्रात आता उमेदवारांना त्यांच्या व त्याच्यावर अवलंबित असलेल्यांच्या उत्पन्नाचा स्त्रोत आणि उत्पन्नाचे व विविध करारांचे तपशील; तसेच यापूर्वी निवडणूक लढवली असल्यास त्याबाबतची माहिती नमूद करावी लागेल.

राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी सांगितले की, महापालिका, नगरपालिका, नगरपंचायती, जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांत उमेदवारांना शपथपत्र सादर करावे लागते. त्यात प्रामुख्याने मत्ता व दायित्व, शैक्षणिक पात्रता आणि गुन्हेगारी पार्श्वभूमीविषयक माहिती नमूद करावी लागते; परंतु सर्वोच्च न्यायालयाने १६ फेब्रुवारी २०१८ रोजी दिलेल्या निर्देशानुसार शपथपत्रात आता नवे बदल करण्यात आले आहेत. उमेदवाराच्या स्वत:च्या व त्यांच्यावर अवलंबून असलेल्यांच्या उत्पनाचा स्त्रोत आणि त्याबाबतचे मागील तीन वर्षांचे तपशील सादर करावे लागतील. त्यात शेती, नोकरी, व्यापार/ व्यवसाय, भांडवली नफा, बक्षिसे/ देणग्या व इतर उत्पन्नाचा तपशील द्यावा लागेल. त्याचबरोबर शासकीय, निमशासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था, सहकारी संस्था इत्यादींसोबतच्या करारांचीदेखील माहिती द्यावी लागेल.

उमेदवाराने यापूर्वी निवडणूक लढविली असल्यास, त्या निवडणुकीच्या वेळी सादर केलेल्या माहितीचा गोषवारादेखील शपथपत्रात नमूद करणे आवश्यक राहील. त्यात यापूर्वी लढविलेल्या निवडणुकीचे नाव, निवडणुकीचे वर्षे, त्यावेळी जाहीर केलेल्या स्थावर व जंगम मालमत्तेचे मूल्य, दायित्वे/थकित रकमांचा गोषवारा इत्यादींचा समावेश करण्यात आला आहे.

विकासाचे व्हिजनही द्यावे लागणार!
निवडून आल्यावर संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेच्या क्षेत्राच्या विकासासाठी करणार असलेल्या उपाययोजनांचीही माहिती जास्तीत जास्त पाचशे शब्दांत नमूद करावी लागेल. आता यापुढे होणाऱ्या सार्वत्रिक आणि पोटनिवडणुकांमध्ये हा बदल लागू होईल.

Web Title: Candidates now produce the affidavit, details are mandatory; Election Commission Order

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.