अर्जात त्रुटी राहू नये यासाठी उमेदवार दक्ष; वकील व चार्टर्ड अकाऊंटंटची उमेदवारांमध्ये डिमांड वाढली
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2025 09:47 IST2025-12-23T09:46:53+5:302025-12-23T09:47:04+5:30
- खलील गिरकर लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : महापालिकेच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्यास मंगळवारपासून प्रारंभ होत आहे. यामुळे उमेदवारी अर्ज ...

अर्जात त्रुटी राहू नये यासाठी उमेदवार दक्ष; वकील व चार्टर्ड अकाऊंटंटची उमेदवारांमध्ये डिमांड वाढली
- खलील गिरकर
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : महापालिकेच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्यास मंगळवारपासून प्रारंभ होत आहे. यामुळे उमेदवारी अर्ज भरताना त्यात तांत्रिक त्रुटी राहू नये याची काळजी उमेदवार घेत आहेत. यासाठी वकील आणि चार्टर्ड अकाऊंटंट यांच्याकडे उमेदवारांची गर्दी वाढत आहे. पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरणाऱ्या उमेदवारांमध्ये अर्ज भरण्याबाबत धास्ती आहे. यामुळे तज्ज्ञांची मदत घेऊन अर्ज भरण्याची तयारी केली जात आहे.
निवडणूक आयोगाने अर्ज दाखल करताना, तीन वर्षांचे आयकर विवरणपत्र, मालमत्ता व देणी यांचे मूल्यांकन, प्रतिज्ञापत्र, खर्चाचा तपशील, उत्पन्नाचे स्रोत, मालमत्तेची माहिती, थकीत कर्जे आणि गुन्हेगारी प्रकरणांची माहिती देणे अनिवार्य केले आहे. यातील माहिती अपूर्ण किंवा चुकीची ठरल्यास अर्ज बाद होण्याची शक्यता असल्याने उमेदवार काळजी घेत आहेत. उमेदवारी अर्जातील कायदेशीर बाबी, शपथपत्रांची मांडणी, जातीचा दाखला, निवडणूक नियमांचे पालन याबाबत वकील मार्गदर्शन करत आहेत. खर्चमर्यादेचे नियोजन आणि नंतरच्या टप्प्यात खर्च नोंदवही ठेवण्याचे कामामध्ये सीएची मदत घेतली जात आहे. घर, पुनर्विकासातील सदनिका, शेअर्स, म्युच्युअल फंड, कर्जांचा तपशील देणे अनेकांसाठी क्लिष्ट ठरत आहे. याचे बाजारमूल्य, रेडी रेकनर दर आणि देणी नमूद करण्यासाठी मदत घेतली जात आहे. प्रचारात जास्त होत असल्याने खर्चाची मर्यादा ओलांडली जाणार नाही, याची काळजी घेण्याबाबत सल्ला घेतला जात आहे. तांत्रिक त्रुटींमुळे अर्ज बाद होण्याचा धोका नको, अशी इच्छुकांची भूमिका आहे. इच्छुकांकडून विविध कागदपत्रे नोटरी करण्याचे काम वाढले असल्याची माहिती ॲड. शीतल पाखरे यांनी दिली.
अर्ज भरताना कोणतीही चूक होऊ नये यासाठी इच्छुक उमेदवार दक्ष आहेत. त्यांना आवश्यक ते कायदेशीर साहाय्य केले जात आहे. निवडणूक जाहीर झाल्यापासून या प्रकारच्या कामांत वाढ झाली आहे.
- ॲड. विकास गांगुर्डे