Cancellation of license after one and a half nights; State excise department will conduct surveillance with police | रात्री दीडनंतर मद्यविक्री केल्यास परवाना रद्द; पोलिसांसह राज्य उत्पादन शुल्क विभाग करणार पाहणी
रात्री दीडनंतर मद्यविक्री केल्यास परवाना रद्द; पोलिसांसह राज्य उत्पादन शुल्क विभाग करणार पाहणी

मुंबई : अनिवासी भागांमध्ये नाइटलाइफला परवानगी मिळाल्यामुळे रेस्टॉरंट, दुकाने, आस्थापना २४ तास सुरू राहणार आहेत़ परंतु, रात्री दीड वाजल्यानंतर त्या ठिकाणी मद्यविक्री करण्यास मनाई करण्यात आली आहे. हा नियम डावलून मद्यविक्री करणाऱ्यांना कठोर कारवाईचा सामना करावा लागणार आहे़ यामध्ये मद्यविक्रीचा परवाना दोन वर्षांसाठी रद्द होणे अथवा २४ तास सुरू राहण्याची परवानगी नाकारण्यात येणार आहे.

पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून मुंबईत नाइटलाइफ सुरू होणार आहे. काही मॉल्सने रात्रभर मॉल्स सुरू ठेवण्याची तयारी दाखविली आहे़ तर काही दुकाने आणि आस्थापनाही लवकरच असा निर्णय घेण्याची शक्यता आहे़ नाइटलाइफला परवानगी देताना काही मर्यादाही निश्चित करण्यात आल्या आहेत़ याबाबतची नियमावली तयार करण्यात आली असून त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जाणार आहे़ यासाठी मुंबई पोलीस दल आणि राज्य उत्पादन शुल्क विभाग सतर्क असणार आहे.

या नियमांचे पालन केले जात आहे, याची शहनिशा करण्यासाठी मुंबई पोलीस दल आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाकडून अचानक छापा मारण्यात येईल़ या पाहणीत नियमाचे उल्लंघन होत असल्याचे आढळून आल्यास त्या रेस्टॉरंट अथवा आस्थापनांचा परवाना दोन वर्षांसाठी रद्द करण्यात येणार आहे़ कोणतेही शुल्क न आकारता मॉलअंतर्गत लाइव्ह बँडचे आयोजन करण्याची परवानगी असणार आहे़

सहा ठिकाणी फूड ट्रक
- जुहू चौपाटी रोड, गिरगाव चौपाटी रोड, वांद्रे-कुर्ला संकुल रोड, वरळी सीफेस, वांद्रे बँडस्टँड आणि नरिमन पॉइंट येथे फूड ट्रकला परवानगी देण्यात येणार आहे.
- नाइटलाइफसाठी बाहेर पडणा-या लोकांच्या सोयीकरिता बेस्ट बस आणि रेल्वे सेवा सुरू ठेवण्याबाबतही विचार केला जात आहे़ याची व्यवहार्यता तपासून निर्णय घेतला जाणार आहे़े़

Web Title: Cancellation of license after one and a half nights; State excise department will conduct surveillance with police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.