निवडणूक कार्यालय कुठे आहे हे कोणी सांगेल का? एस वॉर्डमध्ये शेवटच्या क्षणापर्यंत शोधाशोध
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2025 10:57 IST2025-12-23T10:56:56+5:302025-12-23T10:57:11+5:30
राज्य शासनाच्या राजपत्रात निवडणूक अधिकारी आणि त्यांचे कार्यालयीन पत्ते यांच्यात वारंवार बदल करण्यात आल्याने गोंधळात आणखी भर पडली.

निवडणूक कार्यालय कुठे आहे हे कोणी सांगेल का? एस वॉर्डमध्ये शेवटच्या क्षणापर्यंत शोधाशोध
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : उमेदवारी अर्ज भरण्याच्या अंतिम टप्प्यात निवडणूक कार्यालयांची निश्चिती होत नसल्यामुळे एस वॉर्डमधील १० प्रभागांतील उमेदवारांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. दुसरीकडे निवडणूक कार्यालयांची व्यवस्था शेवटच्या क्षणापर्यंत सुरू असल्याने उमेदवार, निवडणूक अधिकारी व कर्मचाऱ्यांचीही धावपळ उडाल्याचे येथे पहावयास मिळाले.
राज्य शासनाच्या राजपत्रात निवडणूक अधिकारी आणि त्यांचे कार्यालयीन पत्ते यांच्यात वारंवार बदल करण्यात आल्याने गोंधळात आणखी भर पडली. अर्ज भरण्याच्या एक दिवस आधी सोमवारी दुपारपर्यंत जाहीर केलेल्या यादीनुसार एस वॉर्डमधील प्रभाग क्रमांक १११, ११२, ११५ ते १२२ या १० प्रभागांसाठीचे निवडणूक कार्यालय हे विक्रोळीतील कन्नमावर नगर-१ येथील पालिका शाळेत असल्याचे नमूद करण्यात आले होते. मात्र प्रत्यक्ष ठिकाणी भेट दिल्यानंतर तेथे निवडणूक कार्यालय नसल्याचे समोर आले.
ठोस माहिती मिळेना
या संदर्भात वारंवार निवडणूक अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करूनही ठोस माहिती मिळाली नाही. त्यामुळे काही उमेदवारांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते.
अखेर सायंकाळी ५:३० वाजता सुधारित यादी जाहीर करण्यात आली. त्यानुसार निवडणूक कार्यालय पालिकेच्या एस वॉर्डमध्ये असल्याचे नमूद करण्यात आले. त्यानंतर अधिकारी, कर्मचारी यांची एस वाॅर्डमध्ये धावपळ दिसून आली.
तेथेही भेट दिल्यानंतर कर्मचाऱ्यांमध्ये स्पष्ट माहितीचा अभाव आणि गोंधळाचे वातावरण होते. याबाबत निवडणूक अधिकारी वैशाली ठाकूर परदेशी यांच्या भेटीचा तसेच संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी बैठकामध्ये व्यस्त असल्याने प्रतिसाद दिला नाही.
पोलिसांचीही तारांबळ
निवडणूक कार्यालय विक्रोळीत असल्याने पोलिसही निश्चिंत होते. मात्र, अखेरच्या क्षणाला बदल झाल्याने त्यांचीही सुरक्षा व्यवस्था पुरवण्यासाठी धावपळ दिसून आली.