Join us  

केम्प्स कॉर्नर : इमारतींना धोका पोहोचू नये तसेच हे काम करण्यासाठी काही काळ मार्ग बंद

By ऑनलाइन लोकमत | Published: August 06, 2020 3:17 PM

बाबुलनाथ जंक्शन नजीक असणा-या परिसरातील उतारावरील भाग खचला.

मुंबई : मुंबई शहरासह उपनगरात मुसळधार सरी कोसळत असतानाच बुधवारी रात्री साडे अकरा वाजता बाबुलनाथ जंक्शन नजीक असणा-या परिसरातील उतारावरील भाग खचला. सदर घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झालेल्या महापालिकेने येथील राडारोडा आणि कोसळलेली झाडे हटविण्याचे काम वेगाने हाती घेतले. या काळात येथील रस्त्यावरील वाहतूक पुर्णत: कोलमडली. आता महानगरपालिकेने बुधवारी रात्रीच सर्व यंत्रणा कार्यान्वित करून वाहतूक इतर मार्गाने परावर्तित करून कामाला सुरुवात केली. सद्यस्थितीत दोन लेनचा रस्ता खचला गेला असून लगतच्या इमारतींना धोका पोहोचू नये तसेच हे संपूर्ण काम पूर्ण करण्यासाठी काही काळ हा मार्ग बंद ठेवण्यात येणार आहे.

केम्प्स कॉर्नर येथील दुर्घटनेची माहिती मिळताच मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी घटनास्थळाची पाहणी केली. शिवाय पाहणीदरम्यान येथे उपस्थित अधिका-यांना वेगाने काम करण्याचे निर्देश दिले. शिवाय दुर्घटनेची सविस्तर माहिती जाणून घेतली. आणि पेडर रोडवरील वाहतूक खोळंबणार नाही; याची खबरदारी घ्या, असेही निर्देश दिले. तर महापौर किशोरी पेडणेकर यांनी खासदार अरविंद सावंत यांच्यासमवेत येथील दुर्घटनास्थळाची पाहणी केली. बी जी. खैर मार्ग, पाटकर रस्त्यालगत असलेली संरक्षक भिंत ही अति जोरदार पावसामुळे एन. एस. पाटकर मार्गावर बुधवारी  रात्री साडे अकरा वाजता कोसळली होती.  महापौर म्हणाल्या की, संरक्षक भिंतीच्या वरच्या भागात चारशे, तीनशे, मिलिमीटर व्यासाच्या पाण्याच्या मोठ्या चार लाईन आहेत. त्यासोबतच दगडाचा पाया असलेली संपूर्ण दगडात बांधलेली ही संरक्षक भिंत होती. परंतु डोंगरावरून धबधब्यासारखे कोसळणाऱ्या पाण्याच्या प्रवाहाने ही संरक्षक भिंत खचली.  महानगरपालिकेने रात्रीच सर्व यंत्रणा कार्यान्वित करून वाहतूक इतर मार्गाने परावर्तित करून कामाला सुरुवात केली. सद्यस्थितीत दोन लेनचा रस्ता खचला गेला असून लगतच्या इमारतींना धोका पोहोचू नये तसेच हे संपूर्ण काम पूर्ण करण्यासाठी काही काळ हा मार्ग बंद ठेवण्यात येणार आहे.

 

टॅग्स :मुंबई मान्सून अपडेटपाऊसमुंबईमुंबई महानगरपालिका