बंडोबा थंडावल्यावर चढेल प्रचार ज्वर! काहींनी भेटीगाठी घेत जनसंपर्कावर दिला भर
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2026 13:33 IST2026-01-02T13:31:05+5:302026-01-02T13:33:34+5:30
मुंबई : महापालिकेच्या निवडणुकीसाठी शुक्रवार, २ जानेवारीला उमेदवारी अर्ज माघारी घेतले जाणार आहेत. त्यानंतर शनिवार, ३ जानेवारीला निवडणूक चिन्हाचे ...

बंडोबा थंडावल्यावर चढेल प्रचार ज्वर! काहींनी भेटीगाठी घेत जनसंपर्कावर दिला भर
मुंबई : महापालिकेच्या निवडणुकीसाठी शुक्रवार, २ जानेवारीला उमेदवारी अर्ज माघारी घेतले जाणार आहेत. त्यानंतर शनिवार, ३ जानेवारीला निवडणूक चिन्हाचे वाटप व अंतिम उमेदवारांची यादी जाहीर होईल. लढतीचे खरे चित्र स्पष्ट झाल्यानंतरच मिरवणुका, नेत्यांच्या जाहीर सभा, बैठकांना वेग येईल व निवडणुकीचा माहोल खऱ्या अर्थाने रंगत जाईल. तूर्त बहुतांश ठिकाणी मात्र वातावरण थंडच आहे.
सध्या उघड प्रचाराऐवजी ‘छुपा प्रचार’ सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. उमेदवार रात्री उशिरापर्यंत अनेक ठिकाणी विशेषत: सोसायट्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या भेटी घेऊन मतदारांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत आहेत. थेट बॅनर, होर्डिंग किंवा प्रचार साहित्य दिसत नसले तरी जनसंपर्क वाढवण्यावर भर दिला जात आहे. अनेक ठिकाणी नागरिकांशी वैयक्तिक संवाद, फोन कॉल्स, सोशल मीडियावरील हालचाली याद्वारे वातावरण तयार करण्याचा प्रयत्न
सुरू आहे.
देवदर्शनातून मतपेरणी
अनेकांनी आचारसंहिता लागू होण्यापूर्वी प्रचाराची संधी साधली. मतदारांना आकर्षित करण्यासाठी त्यांना विविध धार्मिक स्थळी देवदर्शन, विविध वस्तूंचे वाटप करून मतपेरणी केली आहे. आचारसंहिता लागू झाल्याने अधिकृत प्रचाराला प्रारंभ होण्याची प्रतीक्षा आहे.
इच्छुकांनी दबावगट, अंतर्गत नाराजी किंवा पक्ष नेतृत्वावर प्रभाव टाकण्यासाठी अर्ज दाखल केले असले, तरी प्रत्यक्ष लढत कोणामध्ये होणार याचा उलगडा अर्ज माघारीनंतरच होईल. काही प्रभागांमध्ये बंडखोरीचे संकेत स्पष्ट दिसत आहेत.
अनेक ठिकाणी ‘मैत्रीपूर्ण बंडखोरी’ तर काही ठिकाणी थेट बंडाचे चित्र दिसू शकते. बंडखोरांची समजूत घालण्याचा प्रयत्न उमेदवार व नेतृत्वाकडून केला जात आहे.