Join us  

अंधेरीची केंब्रीज शाळा लवकरच सुरू होणार, 4 जुलैपासून होती बंद 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2019 10:25 PM

महापालिका प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी शिवसेनेने सहा दिवस धरणे आंदोलन केले होते.

मुंबई - महानगर पालिकेच्या अग्निशामक खात्याने फायर सेफ्टी नॉर्मस अपूर्ण असल्याचे कारण देत 4 जुलैपासून पालिकेची शाळा बंद केली होती. मात्र, अंधेरीतील ही केंब्रीज शाळा येत्या आठवड्यात सुरू होणार आहे. शिवसेना आमदार व विभागप्रमुख अॅड. अनिल परब यांनी लोकमतशी बोलतांना ही माहिती दिली. ही शाळा 4 जुलै पासून बंद केल्यामुळे येथील अडीच हजार विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आले होते. 

महापालिका प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी शिवसेनेने सहा दिवस धरणे आंदोलन केले होते. अखेर शाळेने फायर सेफ्टीचे काम सुरू केल्यामुळे शिवसेनेने गेल्या सहा दिवसांपासून सुरू केलेले धरणे आंदोलन मागे घेतले अशी माहिती आमदार परब यांनी दिली. शाळेला फायर सेफ्टीच्या अटी पूर्ण करण्यासाठी पुरेसा वेळही देण्यात आला नाही. या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते-युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या सूचनेनुसार पालिका प्रशासनाच्या या अन्यायकारक कारवाई विरोधात आंदोलन सुरू होते.या शाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकांनी शिवसेना आमदार अँड. अनिल परब यांच्या नेतृत्वाखाली मुंबईचे महापौर प्रा. विश्वनाथ महाडेश्वर यांच्या उपस्थितीत गेल्या शुक्रवारी पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांची भेट घेऊन सदर शाळा लवकर सुरू करण्याची आग्रही मागणी केली.यावेळी सुधार समिती अध्यक्ष सदानंद परब, महिला विभाग संघटक व नगरसेविका राजुल पटेल,माजी नगरसेवक मनोहर पांचाळ,माजी नगरसेवक कमलेश रॉय,नितीन डिचोलकर व इतर मान्यवर उपस्थित होते. यानंतर पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी या शाळेला फायर सेफ्टीच्या उपाययोजना करण्याचे निर्देश देतानाच पालिका प्रशासनाला लवकर शाळा सुरू करण्याची कार्यवाही करण्याचे आदेशही दिले.यानुसार अग्निशमन दलाकडून नुकतीच शाळेला भेट देऊन कार्यवाही करण्यात आली.आज रविवार असून देखिल फायर सेफ्टीचे काम कसे सुरू आहे याची जातीने देखरेख  शाखाप्रमुख संदीप नाईक करत असल्याची माहिती नितीन डिचोलकर यांनी दिली.

दरम्यान या शाळेने सेफ्टी नॉर्मस पूर्ण केल्यानंतरच ही शाळा सुरू होऊ शकेल. मात्र, शाळा कधी सुरू होईल हे आताच काही सांगू शकत नाही असे मत मुंबई महानगर पालिकेच्या अग्निशामक दलाचे मुख्य अग्निशामक अधिकारी प्रभात रहांगदळे यांनी लोकमतशी बोलतांना दिली. शिवसेनेमुळे या शाळेतील अडीच हजार विद्यार्थी तसेच 200 हून जास्त शिक्षक व कर्मचाऱ्यांचे भवितव्य वाचणार असून सदर शाळा लवकर सुरू होणार असल्याचे संकेत मिळाल्याने पालकांकडून शिवसेनेचे आभार मानले  आहेत 

टॅग्स :आमदारशाळाअंधेरीनगर पालिका