उद्घाटन रखडलेला केबल स्टेड पूल आज मुंबईकरांच्या सेवेत!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2025 11:47 IST2025-08-14T11:47:19+5:302025-08-14T11:47:50+5:30

पश्चिम द्रुतगतीवर विद्यापीठ चौक, कलानगर जंक्शनवर कोंडीची चिंता नाही

Cable stayed bridge final phase of the Santa Cruz Chembur Link Road Project will be put into service for passengers from today | उद्घाटन रखडलेला केबल स्टेड पूल आज मुंबईकरांच्या सेवेत!

उद्घाटन रखडलेला केबल स्टेड पूल आज मुंबईकरांच्या सेवेत!

मुंबई : पश्चिम द्रुतगती महामार्गावर मुंबई विद्यापीठ चौकात होणारी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या सांताक्रुझ-चेंबूर लिंक रोड (एससीएलआर) प्रकल्पातील शेवटच्या टप्प्यातील केबल स्टेड पूल आज, गुरुवारपासून प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे. तसेच धारावी येथून येणाऱ्या
वाहनांना सी-लिंक आणि माहीमकडे विनाअडथळा जाता यावे, यासाठी उभारलेल्या बहुप्रतीक्षित कलानगर पुलाचेही उद्घाटन केले जाणार आहे. त्यामुळे गुरुवारपासून पश्चिम उपनगरातील विद्यापीठ चौक आणि कलानगर जंक्शन भागातील वाहनांचा प्रवास वेगवान होणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गुरुवारी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) चार पायाभूत सुविधा प्रकल्पांचे लोकार्पण होणार आहे.

एमएमआरडीएने 'एससीएलआर'चा सीएसटी रोड ते पश्चिम द्रुतगती महामार्गावर वाकोला पुलापर्यंत विस्तार केला आहे. अंतिम टप्प्यात पश्चिम द्रुतगती मार्गाला दहिसर दिशेला जोडण्यासाठी विद्यापीठ चौकात केबल स्टेड पूल उभारला आहे.

'एससीएलआर'ची वैशिष्ट्ये 

पश्चिम द्रुतगती महामार्गावर या पुलाचे वळण अतितीव्र स्वरूपाचे असून, देशातील सर्वाधिक तीव्र वळण असलेला पूल ठरणार आहे. विशिष्ट प्रकारच्या केबल आणि तीव्र वळण यामुळे हा पूल आयकॉनिक स्वरूपाचा ठरला आहे. हा पूल ऑर्थोपेडिक स्टील डेक स्वरूपातील केबल स्टेड पूल आहे. हा पूल २१५ मीटर लांब असून, जमिनीपासून २५ मीटर उंचीवर आहे.

सिग्नल विरहित प्रवास 

अभियांत्रिकी स्वरूपात हे काम किचकट होते. केबल स्टेड पुलामुळे पूर्व-पश्चिम द्रुतगती महामार्गादरम्यान सिग्नल-विरहित आणि अखंड वाहतूक होऊ शकेल. कुर्ला ते विमानतळ सिग्नल विरहित प्रवास शक्य होणार आहे.

धारावी कनेक्टरचे लोकार्पण

 कलानगर जंक्शन येथून माहीम, पश्चिम उपनगर, धारावी आणि बीकेसी या भागात जाण्यासाठी मार्ग आहे. त्यामुळे या चौकात कायमच वाहतूक कोंडी होते. त्यावर तोडगा काढून या भागातील वाहतूक जलद करण्यासाठी येथे तीन मार्गिकांच्या उड्डाणपुलाचे काम २०१७ मध्ये एमएमआरडीएने हाती घेतले.

यापैकी बीकेसीकडून सी-3 लिंककडे ये-जा करण्यासाठी उभारलेली दुसरी मार्गिका २०२१ मध्ये खुली केली. मात्र, धारावी टी-जंक्शन येथून येणाऱ्या वाहनांना वांद्रे-वरळी सी-लिंक आणि माहीमकडे जाता यावे, यासाठी उभारलेल्या ३१० मीटर लांबीच्या मागिंकेचे काम रखडले होते.

...हे प्रकल्पही सेवेत 

मंडाळे डेपो येथील मेट्रोच्या प्रशिक्षण इमारतीचे उद्घाटन करण्यात येणार आहे. मेट्रोच्या कर्मचाऱ्यांसाठी मालवणी येथे उभारलेल्या इमारतीचे उद्घाटन आहे. मेट्रो ३ चे विमानतळ मेट्रो स्थानक आणि छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ यांना जोडण्यासाठी उभारलेल्या फुटओव्हर ब्रीजचे लोकार्पण होणार आहे.
 

Web Title: Cable stayed bridge final phase of the Santa Cruz Chembur Link Road Project will be put into service for passengers from today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई