Join us
Daily Top 2Weekly Top 5

भायखळा, चिंचपोकळी, परळ, दिवा, टिटवाळा होणार चकाचक; १५ स्थानकांचे रूपडे पालटणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2023 07:20 IST

अमृत भारत योजनेंतर्गत १५ स्थानकांचे रूपडे पालटणार, आराखडा तयार

मुंबई : रेल्वे स्थानकातील प्रवेशद्वारावरील अडचणी, नादुरुस्त पाणपोई आणि अस्वच्छ स्वच्छतागृह यांच्या सातत्याने तक्रारी करूनही स्थिती जैसे थे असल्याने, या असुविधा अमृत भारत स्थानक योजनेंतर्गत दूर करण्यात येणार आहेत. मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील १५ रेल्वे स्थानकांचा आराखडा तयार करण्यात आला असून, जूनपासून स्थानकाचे अद्यावतीकरण प्रत्यक्ष सुरू करण्यात येणार आहेत.

रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सर्व क्षेत्रीय रेल्वेचे महाव्यवस्थापक आणि विभागीय रेल्वे व्यवस्थापक यांना अमृत भारत स्थानक योजनेतील अद्यावतीकरणाच्या एप्रिल-मे अखेर निविदा प्रक्रिया पूर्ण कराव्या आणि जूनपासून प्रत्यक्ष स्थानकात काम सुरू करा, अशा सूचना केल्या आहेत, असे रेल्वे मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी सांगितले. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील अधिकाऱ्यांनी या माहितीला दुजोरा दिला आहे.

स्थानकांच्या अद्यावतीकरणात प्रवेशद्वारांचे सुशोभीकरण, स्वच्छतागृहांचा दर्जा वाढविणे, फलाटावर आसनांची संख्या वाढविणे, छत बसविणे, पायऱ्यांची डागडुजी आणि संरक्षित जाळ्या उभारणे, उपलब्ध जागेनुसार स्थानक प्रवेशद्वार बदलणे किंवा अन्य प्रवेशद्वार उपलब्ध करणे, प्रवासी वर्दळीतील अडथळे दूर करणे, आरडीएसओ मंजूर १२ मीटर रुंदीचे पादचारी पूल उभारणे, या सुविधांना प्राधान्य देण्यात येणार आहेत. त्याचबरोबर, स्थानक परिसर आणि फलाटावरील जागेच्या उपलब्धतेनुसार प्रतीक्षालय आणि स्थानिक रेल्वे प्रवाशांच्या गरजेनुसार सुधारणा करण्यात येणार आहे, असे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले. 

स्थानकातील सद्यस्थितीतील समस्या जाणून घेण्यासाठी रेल्वे स्थानकात भेट देऊन तेथील प्रवाशांशी संवाद साधून अडचणी नोंदवाव्यात. त्यानुसार, अद्यावतीकरण करण्यात यावे, अशा सूचना मध्य रेल्वेच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापकांना देण्यात आलेल्या आहे. आराखडा तयार झाल्यावर ज्या बाबींचा समावेश करण्यात आलेला नाही, अशा बाबींचा प्रस्ताव ‘सॉफ्ट अपग्रेडेशन’ अंतर्गत तयार करून, त्याला मंजुरी घेऊन तातडीने कामे सुरू करावीत, अशा सूचना रेल्वे मंडळाकडून देण्यात आलेल्या आहेत. 

कोणत्या स्थानकाचे अद्यावतीकरण?

अमृत भारत स्थानक योजनेच्या पहिल्या टप्प्यात भायखळा, चिंचपोकळी, परळ, माटुंगा, कुर्ला, विद्याविहार, विक्रोळी, कांजूरमार्ग, मुंब्रा, दिवा, वडाळा रोड, सँडहर्स्ट रोड, शहाड, टिटवाळा आणि इगतपुरी या स्थानकांचा समावेश करण्यात आलेला आहे. 

टॅग्स :रेल्वेमुंबई