बोगस कागदपत्रांद्वारे गाड्यांची खरेदी-विक्री; आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश, सव्वासात कोटींच्या महागड्या मोटारी जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2025 08:30 IST2025-02-25T08:30:47+5:302025-02-25T08:30:53+5:30

न घेतलेल्या कर्जाच्या हफ्त्यांची नोटीस बँकांनी व्यापाऱ्यांना पाठवल्यामुळे या गुन्ह्याचा पर्दाफाश झाला.  

Buying and selling cars through bogus documents; Interstate gang busted, expensive cars worth Rs. 7.5 crore seized | बोगस कागदपत्रांद्वारे गाड्यांची खरेदी-विक्री; आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश, सव्वासात कोटींच्या महागड्या मोटारी जप्त

बोगस कागदपत्रांद्वारे गाड्यांची खरेदी-विक्री; आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश, सव्वासात कोटींच्या महागड्या मोटारी जप्त

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई  : महाराष्ट्राबाहेरील व्यापाऱ्यांच्या नावे बनावट कागदपत्रे तयार करून त्या आधारे कर्ज काढून महागड्या गाड्या खरेदी करणाऱ्या आणि त्यांची विक्री करणाऱ्या टोळीचा गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. या कारवाईत सात जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून सव्वा सात कोटींच्या १६ महागड्या गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत. आरोपींकडून जप्त करण्यात आलेल्या कारपैकी तीन चोरीच्या असल्याची माहिती उपायुक्त (गुन्हे) दत्ता नलावडे यांनी दिली. 

महाराष्ट्राबाहेरील व्यापाऱ्यांचा जीएसटी क्रमांक मिळवायचा. या क्रमांकावरून त्यांची कागदपत्रे मिळवून त्यावरून बनावट कागदपत्रे तयार करायची आणि याच कागदपत्रांच्या आधारे कर्ज घेऊन महागड्या गाड्या खरेदी करून त्यांची विक्री करायची, अशी या टोळीची कार्यपद्धती होती. 

रवींद्र दिनानाथ गिरकर उर्फ परदीप रविंदर शर्मा (४७), मनिष सुभाष शर्मा(३९), सय्यद नावेद सय्यद जुल्फीकार अली (५२), दानिश रफिक खान (३२), साईनाथ व्यंकटेश गंजी (२९),यशकुमार सुनिल कुमार जैन (३३) आणि इमान अब्दुल वाहिद खान उर्फ देवा (३८), अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपी मध्य प्रदेशातील इंदोर, कल्याण, डोंबिवली, ठाणे, भिवंडी आणि कुर्ला येथे राहणारे आहेत. पार्कसाइट पोलिस ठाण्यात २०२३ मध्ये दाखल गुन्ह्याच्या चौकशीतून पोलिसांनी या आंतराज्यीय टोळीच्या कारनाम्यांचा छडा लावला.  

चेसिस नंबर एकच, गाड्या मात्र अनेक
या टोळीने वेगवेगळ्या राज्यांतील व्यापाऱ्यांचे कर्जाचे सीबील स्कोअर काढून त्यांच्या नावे बनावट कागदपत्रे तयार केली. त्या आधारे मोठ्या कंपन्यांच्या १६ कारवर बँकांकडून कर्ज काढले. त्या कारचे चेसिस नंबर बदलून त्या नव्या कोऱ्या कार उत्तर प्रदेश, दिल्ली, गुजरात, मध्यप्रदेशसह विविध राज्यांत अगदी कमी किमतीत सर्वसामान्य ग्राहकांना विकल्या. तसेच या टोळीने चोरीच्या वाहनांवर बनावट चेसिस आणि इंजिन क्रंमाक लावून  त्यांचीही परराज्यात विक्री केली होती, असे निष्पन्न झाले आहे.

गुन्हे शाखेची कारवाई 
तपास पथकाने शर्माची चौकशी केली असता, त्याने गुन्ह्याची कबुली दिली. गुन्हे शाखा कक्ष ३ चे प्रभारी पोलिस निरीक्षक सदानंद येरेकर, पोलिस निरीक्षक शामराम पाटील, सहायक पोलिस निरीक्षक अमोल माळी, समीर मुजावर यांच्या पथकाने इंदोर, कल्याण, डोंबिवली, ठाण्यातून इतरांना अटक केली.  

अशी करायचे विक्री
बनावट नावाने आधारकार्ड, पॅनकार्ड, वाहनांचे आरसी बुक, एमएमआरडीएचे ॲलॉटमेंट लेटर, बँक स्टेटमेंट आणि आयटी रिटर्न आदी कागदपत्रांची फाइल तयार करून त्या आधारे ही टोळी मुंबईतील विविध बँकांकडून वाहन कर्ज मिळवून विविध कंपन्यांच्या महागड्या कार खरेदी करीत असे. त्यानंतर त्या गाड्या वेगवेगळ्या राज्यामंध्ये बनावट आरसी बुक बनवून विक्री करत असे. न घेतलेल्या कर्जाच्या हफ्त्यांची नोटीस बँकांनी व्यापाऱ्यांना पाठवल्यामुळे या गुन्ह्याचा पर्दाफाश झाला.  

Web Title: Buying and selling cars through bogus documents; Interstate gang busted, expensive cars worth Rs. 7.5 crore seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :carकार