आता तुम्हीच ठरवा नायलॉन-चिनी मांजा विकत घेऊन पतंगाची दोर कापायची की आयुष्याची?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2023 10:23 AM2023-12-27T10:23:39+5:302023-12-27T10:25:07+5:30

नायलॉन मांजाचा पतंग उडवताना दोघांविरुद्ध गुन्हा.

Buy Nylon chinese manja and cut the string of the life be aware to purchase manja in upcoming makar sankaranti | आता तुम्हीच ठरवा नायलॉन-चिनी मांजा विकत घेऊन पतंगाची दोर कापायची की आयुष्याची?

आता तुम्हीच ठरवा नायलॉन-चिनी मांजा विकत घेऊन पतंगाची दोर कापायची की आयुष्याची?

मुंबई : वाकोलाच्या पश्चिम द्रुतगती महामार्गावर पतंगाचा मांजा गळ्यात अडकल्याने रविवारी दिंडोशी पोलिस ठाण्याचे कॉन्स्टेबल समीर जाधव (३७) यांना जीव गमवावा लागला. याच पार्श्वभूमीवर आता पोलिसांनी पश्चिम द्रुतगती महामार्गावर पतंग उडवत इतरांचा जीव धोक्यात टाकणाऱ्यांविरुद्ध कारवाई सुरू केली आहे. 

खेरवाडी पोलिसांनी याप्रकरणी सोमवारी रात्री दोघांवर गुन्हा दाखल जे नायलॉन मांजाचा वापर करत पतंग उडवताना आढळल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. यापूर्वीदेखील नायलॉन आणि चिनी मांजामुळे अनेकांना जीव गेल्याच्या, अनेकजण जखमी झाल्याच्या सात -आठ घटना घडल्या आहेत.

खेरवाडीच्या हद्दीत असलेल्या पादचारी पुलावर २५ डिसेंबर रोजी संध्याकाळी ६:३० वा. दोन जण हातात प्लास्टिकच्या फिरक्या घेऊन पतंग उडवताना पोलिस पथकाला दिसले. त्यानुसार त्यांनी घटनास्थळी धाव घेत मनोज कातकर (३९) आणि त्याचा भाऊ महेश (४३) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. दोघेही खार पूर्वच्या जवाहरनगर परिसरातील राहणारे आहेत. 

पोलिसांनी त्यांच्याकडून नायलॉन मांजा गुंडाळलेली फिरकी ताब्यात घेतली आहे. या विरोधात पोलिस शिपाई पंकज परदेशी (३५) यांनी तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आली नसल्याचे खेरवाडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र मुळीक यांनी सांगितले. 

कॉन्स्टेबल जाधव यांच्या मानेला मांजा लागून त्यांचा मृत्यू झाला. तो मांजा नायलॉन आहे की चायनीज याबाबतच्या अहवालाची प्रतीक्षा तपास अधिकारी करत असुन पतंग उडविणाऱ्याचा शोध सुरू आहे.

मांजा बनला काळ!

मालाडच्या चिंचोली बंदर येथील विबग्योर शाळेचा इयत्ता दुसरीचा विद्यार्थी दिशांत तिवारी याचाही पतंगाच्या मांजाने बळी घेतला. मनोरजवळील फार्महाऊसवर जाताना गाडीच्या सन रुफमधून डोकावताना हा प्रकार घडला.

राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाच्या ११ जुलै २०१७ च्या आदेशाने स्पष्टपणे केवळ उत्पादन, आयात, साठवणूक आणि विक्रीच नाही तर नायलॉन किंवा सिंथेटिक दोर, तसेच ठेचलेल्या काचेचे आवरण असलेले साहित्य किंवा पदार्थाची खरेदी, वापर करण्यास प्रतिबंधित केले आहे. कोणत्याही कोटिंगशिवाय केवळ कापसापासून बनवलेल्या धाग्यांनाच परवानगी आहे. 

भारतीय दंडसंहिता २०२३ च्या कलम २२३ (१८८ आयपीसी ) अन्वये त्याचे उल्लंघन केल्यास एक वर्षापर्यंतच्या कारावासाची किंवा ५ हजार रुपयांपर्यंतच्या दंडाची किंवा दोन्ही शिक्षेची तरतूद आहे. पर्यावरण (संरक्षण) कायद्याच्या कलम १५ अंतर्गतही उल्लंघन केल्यास ५ वर्षांपर्यंत कारावास आणि १ लाख रुपये दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. भारतीय न्याय संहिता, २०२३ च्या कलम १०६. (१) (३०४ (अ)आयपीसी) नुसार आरोपीला पाच वर्षांपर्यंत वाढू शकणाऱ्या मुदतीसाठी कोणत्याही एका वर्णनाच्या तुरुंगवासाची शिक्षा होईल आणि तो दंडालाही पात्र असेल.- ॲड. विशाल सक्सेना, सर्वोच्च न्यायालय

Web Title: Buy Nylon chinese manja and cut the string of the life be aware to purchase manja in upcoming makar sankaranti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.