Join us  

मुग्धपंखी, कुचलपाद नावांनी ओळखली जाणार फुलपाखरे

By ऑनलाइन लोकमत | Published: December 08, 2019 3:56 AM

सहा कुळांतील २७७ फुलपाखरांचे मराठीतून नामकरण

- सागर नेवरेकर 

मुंबई : महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळाच्या समितीने राज्यातील फुलपाखरांच्या एकूण सहा कुळांतील २७७ फुलपाखरांना मराठी नावे दिली आहेत. ‘मुग्धपंखी’, ‘कुंचलपाद’, ‘चपळकूळ’, ‘नीलकूळ’, ‘पितश्वेत’ व ‘पुच्छ कूळ’ असे या फुलपाखरांच्या कुळांचे मराठीतून नामकरण करण्यात आले आहे. त्यामुळे या फुलपाखरांना आता मराठीतून नवी ओळख मिळाली आहे.

सर्वच पशुपक्ष्यांना त्या-त्या स्थानिक भाषेत नावे व ओळख असली, तरी फुलपाखरू या कीटक गटातील सुंदर अशा लहानग्या जीवास मात्र स्थानिक ओळख नाही. त्यांचा अभ्यास सर्वप्रथम ब्रिटिश काळात केला गेला. फुलपाखरांची नावे इंग्रजी व लॅटीन भाषेत उपलब्ध आहेत. राज्यातील फुलपाखरांना मराठी नावे देण्यासाठी नोव्हेंबर, २०१८ मध्ये एका तज्ज्ञ समितीचे गठन केले होते. महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळाच्या या समितीने राज्यातील एकूण सहा कुळांतील २७७ फुलपाखरांना प्रथमच मराठी नावे दिली आहेत. ही मराठी नावे जास्तीतजास्त लोकांपर्यंत पसरविण्याचे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

फुलपाखरांना देण्यात आलेली काही इंग्रजी सामान्य नावे तर इंग्रज अधिकाऱ्यांच्या पदांच्या नावावरून कमांडर, सार्जंट, कॉन्स्टेबल, लष्कर अशी आहेत. यापूर्वी २०१५ साली महाराष्ट्र हे ‘ब्लु मॉरमॉन’ या फुलपाखरास राज्य फुलपाखरू घोषित करणारे पहिले राज्य ठरले होते. त्यामुळे आजवर फक्त इंग्रजीमध्ये ओळखली जाणारी फुलपाखरे आता मराठीतूनही ओळखली जातील. महाराष्ट्र हे स्थानिक भाषेत नावे देणारे देशातील दुसरे राज्य ठरले आहे. यापूर्वी फुलपाखराला अशी स्थानिक नावे केरळमध्ये देण्यात आली आहेत.फुलपाखरांना दिलेली मराठी नावे अधिकाधिक प्रचलित करण्यासाठी विविध माध्यमांनी पुढाकार घेऊन ती सर्वांपर्यंत पोहोचवावीत, असे आवाहन वन विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे यांनी व्यक्त केले.

लोकांकडून चांगला प्रतिसाद

फुलपाखराला मराठीत नाव दिल्यावर त्याच्या कुळाला अर्धवट सोडायचे का, असा विचार पुढे आला. मंडळाच्या सदस्यांनी मराठी नावांवर खूप मेहनत घेतली आहे. लोकांकडून, विविध साइट्स इत्यादी मार्गाने मराठी नावे उपलब्ध करून घेतली गेली. एखादे नाव दिल्यावर ते आवडले नसेल तर लगेच सांगा; पण त्यावर ट्रोलिंग करू नका, असे आवाहन करण्यात आले होते. दरम्यान, लोकांनी चांगला प्रतिसाद दिला.- डॉ. विलास बर्डेकर,अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळ.प्र

चार, प्रसारासाठी प्रयत्न करणार

फुलपाखरांना दिलेली मराठी नावे प्रचलित करण्यासाठी, त्याच्या प्रचार व प्रसारासाठी यासंदर्भातील पुस्तक प्रसिद्ध करण्यात आले आहे. ते जास्तीतजास्त व्यक्तीपर्यंत पोहोचविले जाईल, तसेच आणखी काही साहित्य निर्माण करून ते विद्यार्थी व अभ्यासकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न केला जाईल.- जयंत वडतकर, सदस्य, महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळ.

फुलपाखरांचे कौतुक मराठी नावानिशी करता येणार

छान किती दिसते... फुलपाखरू! असे म्हणत फुलपाखरांच्या रूप, रंगाचे कौतुक केले जाते; पण त्या फुलपाखराचे नाव काय, हे अनेकदा आपल्याला माहीत नसते. आता या सुंदर फुलपाखरांना मराठी नावे दिल्याने त्या नावांनुसार त्यांची ओळख करून घेऊन त्यांना ‘मुग्धपंखी’, ‘कुंचलपाद’, ‘चपळकूळ’, ‘नीलकूळ’, ‘पितश्वेत’ व ‘पुच्छ कूळ’ अशा प्रकारे त्यांच्या कुळांप्रमाणे मराठीतून ओळखता येईल, अशी माहिती महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळाने दिली.

टॅग्स :पर्यावरणमहाराष्ट्र