फुलपाखरे दिसेनाशी झाली, मुंबईकरांनो सावध व्हा, पर्यावरणतज्ज्ञ अविनाश कुबल यांचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2025 11:21 IST2025-01-14T11:21:01+5:302025-01-14T11:21:17+5:30
दुर्दैवाने मुंबईतील परिस्थिती चिंताजनक आहे.

फुलपाखरे दिसेनाशी झाली, मुंबईकरांनो सावध व्हा, पर्यावरणतज्ज्ञ अविनाश कुबल यांचा इशारा
मुंबई : मुंबईत फुलपाखरांची घटलेली संख्या हवेची शुद्धता कमी झाल्याचे द्योतक असून, निसर्गाने आपल्यासाठी दिलेली ती धोक्याची घंटा आहे. त्यामुळे मुंबईकरांनो, सावध व्हा! कारण वाढलेले हवेचे प्रदूषण फुलपाखरांप्रमाणेच मानवी जीवनालाही धोकादायक ठरण्याची शक्यता आहे, असा इशारा ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ अविनाश कुबल यांनी नुकताच येथे दिला.
चेंबूरच्या एन. जी. आचार्य उद्यानात महापालिकेचा एम-पश्चिम विभाग आणि विवांत अनटेम्ड अर्थ फाउंडेशनच्या वतीने आयोजित फुलपाखरू महोत्सवात ‘शहरी अधिवास आणि फुलपाखरांचे संवर्धन’ या विषयावर अविनाश कुबल बोलत होते.
कुबळ म्हणाले, रानावनात, बागबगिच्यांमध्ये बागडणारी फुलपाखरे हे हवेच्या शुद्धतेचे प्रमुख निर्देशक आहेत. ज्या ठिकाणी पर्यावरणाची काळजी घेतली जाते, अशा भागात फुलपाखरांच्या बहुसंख्य प्रजाती आढळतात. दुर्दैवाने मुंबईतील परिस्थिती चिंताजनक आहे. पूर्वी मुंबईतील बागबगिच्यांमध्ये, अगदी रस्त्याच्या मधोमध असलेल्या हिरवळीच्या ठिकाणी फुलांच्या ताटव्यांवर फुलपाखरे सहज दिसून यायची, पण आता ती जवळपास दिसेनाशी झाली आहेत.
...तरच जीवन सुरक्षित
मुंबईत फुलपाखरांची जीवनसाखळी संपुष्टात येणे ही धोक्याची घंटा आहे. त्यासाठी प्रदूषण तातडीने रोखायला हवे. वाहन प्रदूषण, धुलिकण, रासायनिक प्रक्रियांमधून बाहेर पडणारा विषारी वायू यावर नियंत्रण आणण्यासाठी उपाययोजना अंमलात आणली, तरच प्रदूषण कमी होऊन मुंबईकरांचे जीवन सुरक्षित राहील, असेही कुबल म्हणाले.