बिझनेस हब की वाढत्या प्रदूषणाचे केंद्र? बीकेसीमध्ये वाहनांची वाढती संख्या : माझगाव, चेंबूर परिसरातही हवा खराब
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2025 12:05 IST2025-12-08T12:04:08+5:302025-12-08T12:05:19+5:30
गेल्या काही वर्षांपासून माझगाव आणि परिसरात मोठ्या प्रमाणावर प्रदूषण नोंदविले जात आहे. त्या खालोखाल वांद्रे-कुर्ला संकुल (बीकेसी), चेंबूर, मालाड यासारख्या परिसरात प्रदूषण आहे.

बिझनेस हब की वाढत्या प्रदूषणाचे केंद्र? बीकेसीमध्ये वाहनांची वाढती संख्या : माझगाव, चेंबूर परिसरातही हवा खराब
सचिन लुंगसे
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरातील वायू प्रदूषणाचा प्रश्न दिवसागणिक जटील होत असून माझगाव, बीकेसी आणि चेंबूरसह लगतच्या परिसरातील प्रदूषणात वाढ होत आहे. वाऱ्याचा वेग, दिशा आणि वाढत्या बांधकामांसोबत वाहनांची वाढती संख्या वायू प्रदूषणात भर घालत आहे. सध्या सुरू असलेल्या उपाययोजनांऐवजी आणखी कठोर उपाययोजनांची गरज असल्याचे मत पर्यावरण अभ्यासकांनी व्यक्त केले आहे.
गेल्या काही वर्षांपासून माझगाव आणि परिसरात मोठ्या प्रमाणावर प्रदूषण नोंदविले जात आहे. त्या खालोखाल वांद्रे-कुर्ला संकुल (बीकेसी), चेंबूर, मालाड यासारख्या परिसरात प्रदूषण आहे. माझगाव येथील प्रदूषणाबाबत काही वर्षांपूर्वी उलटसुलट चर्चांना उधाण आले होते. हवेच्या गुणवत्तेचा दर्जा नोंदविला जाणाऱ्या येथील यंत्रात तांत्रिक दोष असल्याची चर्चा रंगली होती. मात्र, यावर महापालिका किंवा प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून काहीच स्पष्टीकरण आले नाही. दरम्यानच्या काळात संपूर्ण मुंबईत प्रदूषणात वाढ झाली. कुर्ला, बीकेसी, चेंबूर, गोवंडी, मानखुर्द या परिसरांसोबतच मालाड, अंधेरी, चकाला येथेदेखील प्रदूषण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे.
संपूर्ण मुंबईतच शक्य असेल त्या आस्थापनांनी कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याची परवानगी दिल्यास वाहनांमुळे होणारे प्रदूषण कमी होईल. पालिका आणि प्रदूषण नियंत्रण मंडळानेही आता लागू केलेल्या सूचनांंव्यतिरिक्त प्रदूषण करणाऱ्या घटकांना वेळीच ताकीद दिली तर दिल्लीसारख्या प्रदूषणाचा आपल्याला सामना करावा लागणार नाही.
भगवान केसभट, पर्यावरण अभ्यासक ‘दिल्लीसारख्या उपाययोजनांची गरज’
धुळ, धूर आणि धुके यांच्या संयुक्त मिश्रणाने तयार होणारे धुरके मुंबईतील हवा खराब करते. यावर मुंबई महापालिका आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून सातत्याने उपाययोजना केल्या जातात. मात्र, दिल्लीसारख्या उपाययोजना मुंबईत लागू केल्या तर कदाचित प्रदूषणाचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल, असे अभ्यासकांचे म्हणणे आहे.
कचरा जाळण्याने प्रदूषणात वाढ
चेंबूर परिसरातून माझगावच्या दिशेने वाहणाऱ्या वाऱ्याची बदलणारी दिशा, वाऱ्याचा वेग अशी काही कारणे येथील प्रदूषणाला कारणीभूत असल्याचे पर्यावरण अभ्यासकांनी सांगितले, तर बीकेसी बिझनेस हब झाल्याने येथे वाहनांची संख्या वाढली आहे. त्याशिवाय येथे आणि लगतच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर बांधकामे सुरू आहेत.
रस्त्यांची आणि इतर विकासकामे सुरू आहेत. त्यातील धूळ आणि धूर प्रदूषणास कारणीभूत आहे, असे अभ्यासकांनी वारंवार सांगितले आहे. चेंबूरच्या रिफायनरी व्यतिरिक्त गोवंडी परिसरातील डम्पिंग ग्राउंडवर जाळल्या जाणाऱ्या कचऱ्यामुळे प्रदूषणात वाढ होत आहे.