नवीन महापौरांसाठी बंगला होतोय सज्ज; डागडुजीसह फर्निचर, खुर्च्यांची कामे प्रस्तावित
By सीमा महांगडे | Updated: January 22, 2026 13:58 IST2026-01-22T13:58:02+5:302026-01-22T13:58:44+5:30
भायखळा येथील राणीच्या बागेतील महापौर बंगला सज्ज होत आहे

नवीन महापौरांसाठी बंगला होतोय सज्ज; डागडुजीसह फर्निचर, खुर्च्यांची कामे प्रस्तावित
सीमा महांगडे, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: महापौरपदासाठी आज गुरुवारी आरक्षण सोडत काढण्यात येणार असून, त्यानंतर या पदाचा मान कुणाला मिळेल, याचा अंदाज येणार आहे. मात्र, दुसरीकडे नवीन महापौरांच्या स्वागतासाठी भायखळा येथील राणीच्या बागेतील महापौर बंगला सज्ज होत आहे.
गेली साडेतीन वर्षे हा बंगला बंद असल्यामुळे प्रशासनाकडून तेथे डागडुजीसह फर्निचर, खुर्च्या, गाद्या, कार्पेट, पीव्हीसी फ्लोअरिंगची दुरुस्ती व बदलाची कामे प्रस्तावित आहेत. सध्याच्या हेरिटेज सोफा व खुर्च्यांसाठी नवीन फॅब्रिक व फोम बसवून नवीन झळाळी देण्यात येणार आहे.
प्रशासक नेमण्याच्या आधी महापौरांचा निवास हा राणीच्या बागेतील नव्या महापौर बंगल्यात हलवण्यात आला. राणीच्या बागेतील हा बंगला १९३१ मध्ये बांधण्यात आला. मात्र, ब्रिटिशांनी या बंगल्याचा वापर कॅफेटेरिया म्हणून केला होता. १९७४ पासून हा बंगला म्हणजे पालिकेतील प्रशासकीय अधिकाऱ्यांचे निवासस्थान होते. त्यानंतर याचा वापर महापौरांसाठी होऊ लागला आहे. महापौर बंगला पालिकेच्या हेरिटेज विभागाच्या अखत्यारित येत असून, त्याचे आकारमान साधारण सहा हजार चौरस फूट आहे.राणीच्या बागेतील पाटणवाला मार्गाला समांतर असलेला व सागवान लाकडाची रचना असलेला हा बंगला कौलारू आहे.
पेंटिंग, पॉलिशिंग...
बंगल्याची संरचनात्मक तसेच कौलांचा आधार असलेल्या लाकडाची डागडुजी, पेंटिंग व पॉलिशिंगची कामे, वाळवीप्रतिरोधक कामे करण्यात येत आहेत. तसेच ८७ आरएफटी सोफ्याची डागडुजी, ४५ लाकडी खुर्च्या तसेच महापौरांसाठी दोन खास खुर्च्यांचे काम प्रस्तावित आहे. सोफ्यासाठी नवीन कुशन, सहा ते आठ इंच जाडीच्या मेमरी फोम गाद्याही आणण्यात येणार आहेत.
बंगल्यात पीव्हीसी फ्लोअरिंग (१६१.८६ चौ.मी.), इनडोअर व आउटडोअर वापरासाठी लाल कार्पेट, लाकडी खुर्च्या, सोफा, बेड यांना पॉलिश करण्याचाही समावेश आहे.
जुन्या पीव्हीसी फ्लोअरिंग व कार्पेट काढून टाकणे, पितळी रॉड काढून पुन्हा बसवणे, तसेच फ्लोअरिंगसाठी बेस लेव्हलिंगची कामेही काही दिवसांत प्रस्तावित आहेत.
वाळवी, पावसामुळे प्लायवूड झाले खराब
पालिकेत प्रशासक राजवट लागू झाल्यानंतर या बंगल्याचा वापर बंद झाल्यामुळे बंगल्यात वाळवी लागली. मंगलोरी कौलांच्या खाली असलेले प्लायवूड वाळवी व पावसाच्या पाण्यामुळे खराब झाले. त्यामुळे वाळवी प्रतिरोधक कामांबरोबरच संरचनात्मक डागडुजी व अन्य कामे मोठ्या प्रमाणात कंत्राटदारामार्फत करण्यात आली.