शुभ मुहूर्तावर बंपर खरेदी; जीएसटी कपातीमुळे दसऱ्याच्या मुहूर्तावर टीव्ही, एसी, फ्रिजला पसंती
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2025 13:28 IST2025-10-03T13:26:37+5:302025-10-03T13:28:28+5:30
साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या दसऱ्याच्या मुहूर्तावर गुरुवारी मुंबईतील ग्राहकांनी इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची जोरदार खरेदी केल्याचे पाहायला मिळाले.

शुभ मुहूर्तावर बंपर खरेदी; जीएसटी कपातीमुळे दसऱ्याच्या मुहूर्तावर टीव्ही, एसी, फ्रिजला पसंती
महेश कोले
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या दसऱ्याच्या मुहूर्तावर गुरुवारी मुंबईतील ग्राहकांनी इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची जोरदार खरेदी केल्याचे पाहायला मिळाले. यंदा केंद्र सरकारने इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंवरील वस्तू आणि सेवा करामध्ये (जीएसटी) २८ वरून १८ टक्क्यांपर्यंत कपात केली आहे. त्यामुळे दर कमी झाल्याने ग्राहकांनी टेलिव्हिजन (टीव्ही), एअर कंडीशनर (एसी), ओव्हन, फ्रिज, वॉशिंग मशीन आदींची मोठ्या प्रमाणावर खरेदी केली. परिणामी बाजारात चैतन्याचे वातावरण आहे.
जीएसटीच्या कपातीमुळे सर्व वस्तूंचे सुधारित दर नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवसापासून लागू झाले. त्यामुळे यंदा नवरात्र-दसऱ्याच्या मुहूर्तावर बाजारपेठांमध्ये कपडे, दागदागिने, सजावटीच्या वस्तूंसोबतच ईलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीकडे ग्राहकांचा अधिक कल होता. शहरातील प्रमुख मॉल्स, ईलेक्ट्रॉनिक शोरूम्स, तसेच ई-कॉमर्स कंपन्यांनी आणलेल्या आकर्षक ऑफर्स, सवलतींचाही लाभ घेत ग्राहकांनी यंदा मोठ्या प्रमाणावर खरेदी केली. अनेक ग्राहकांनी नवरात्रोत्सवात वस्तूंचे बुकिंग करून दसऱ्याच्या मुहूर्तावर वस्तूंची डिलिव्हरी घेतली. एका खरेदीदाराने सांगितले की, सणासुदीला घरात नवी वस्तू आणणे शुभ मानले जाते. जीएसटी कपातीमुळे आम्ही यंदा मोठा स्मार्ट टीव्ही घेण्याचा निर्णय घेतला.
५ ते २५ हजार रुपयांपर्यंत कॅशबॅक, बाय बॅक
दुसरीकडे विक्रेत्यांनी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंवर ५ ते २५ हजारांपर्यंतची कॅशबॅक, बाय बॅक, सवलती, बँक ऑफर, अतिरिक्त वॉरंटी, सुलभ ईएमआय आदी योजना आणल्या होत्या.
मध्यमवर्गीय ग्राहक मोठ्या प्रमाणावर स्मार्ट टीव्ही आणि डबल-डोअर फ्रिज घेण्यासाठी पुढे आल्याचे दुकानदारांनी सांगितले.
जीएसटी कपातीमुळे ग्राहकांना भरघोस लाभ
इलेक्ट्रॉनिक्स वस्तू किमतीत घट (रुपयेे)
टीव्ही (३२ इंचांपेक्षा मोठे) ३,००० ते ७,००० पर्यंत
एअर कंडिशनर (एसी) ४,००० ते १०,००० पर्यंत
फ्रिज (डबल-डोअर/स्मार्ट) ३,५०० ते ८,००० पर्यंत
वॉशिंग मशिन्स २,५०० ते ६,००० पर्यंत
यंदा दिवाळीतही तेजी ?
सणासुदीला बाजारपेठेत नेहमीच उत्साह असतो, मात्र यंदा जीएसटी कपात, आकर्षक ऑफर्सची सुवर्णसंधी साधत दुसऱ्याच्या शुभमुहूर्तावर ग्राहकांनी खरेदी करून आपला आनंद द्विगुणित केल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे. दिवाळीतही अशीच तेजी पाहायला मिळेल, असा अंदाज त्यांनी वर्तवला.