Join us
Daily Top 2Weekly Top 5

'दादागिरी हा आमचा धंदा'; अंबादास दानवेंनी सांगितली दादा कोंडकेची आठवण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2023 15:58 IST

मुंबई महापालिकेतील सदर घटनेवरुन सध्या राज्याचं राजकारण तापलं आहे. या घटनेवरुन भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी निशाणा साधला आहे.

मुंबई - अनियमित पाणीपुरवठा, अपूर्ण नालेसफाई अशा नागरी समस्यांनी हैराण झालेल्या खार, वांद्रे व सांताक्रूझ येथील नागरिकांनी सोमवारी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार अॅड. अनिल परब यांच्या नेतृत्वाखाली महापालिका 'एच' पूर्व विभाग कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा काढला. मात्र, यादरम्यान तेथे शिवसेना शाखेवर कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्याला पाहून संतप्त कार्यकर्त्यांनी त्याला मारहाण केल्याने मोर्चाला गालबोट लागले. विशेष म्हणजे अनिल परब यांच्यासमोरच संबधित अधिकाऱ्याला शिवसैनिकांनी कानशिलात लगावली होती. त्यावरुन, आता राजकीय वातावरण तापलं आहे. त्यातच, शिवसेना नेते आणि विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनीही या कृतीचं समर्थन केलंय. 

मुंबई महापालिकेतील सदर घटनेवरुन सध्या राज्याचं राजकारण तापलं आहे. या घटनेवरुन भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी निशाणा साधला आहे. अनिल परबांची ''रस्सी जल गई, पर बल नही गया'', असं चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे. कायदेतज्ञ ॲड अनिल परबांनी कायद्याला न जुमानता महापालिका कार्यालयात घुसून अधिकाऱ्यांना मारहाण केली. अशा माजोरड्या वृत्तीचा निषेध करायलाच पाहीजे. अधिकाऱ्यां मारहाण करण्याचा चुकीचा पायंडा ठाकरेंकडून पाडला जातोय. अनिल परबांवर पोलिसांनी कडक कारवाई करायला पाहीजे, अशी मागणी चित्रा वाघ यांनी केली आहे. मात्र, अंबादास दानवे यांनी शिवसेनेच्या या कृतीचं समर्थन करताना दिवंगत अभिनेते दादा कोंडके यांच्या एका डायलॉगची आठवण करुन दिली. 

अंबादास दानवे यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन मुंबई महापालिकेतील घटनेचा व्हिडिओ शेअर केला आहे. त्यामध्ये, शिवसैनिकांकडून अधिकाऱ्याला मारहाण करण्यात आल्याचे दिसून येते. त्या व्हिडिओसह दानवे यांनी हीच खरी शिवसेना, असलीवाली शिवसेना असे म्हणत दादा कोंडकेंची आठवणही सांगितली. 'शिवसेनेला दादागिरी शिकवायची नाही, तो आमचा धंदा आहे', हे वाक्य दादा कोंडके यांनी सांगितले होते. बोगस कार्यक्रम असल्याचे सांगून एकट्या महिलेला चोप देणारी औलाद आम्ही नाहीत. आम्ही देतो ती भर बाजारात.. ती पण अशी!, असे अंबादास दानवे यांनी म्हटलं आहे. तसेच, इलाका हमारा, आवाज भी हमारा!! नाम याद रखना 'असली वाली शिवसेना, असेही त्यांनी म्हटलंय. 

दरम्यान, वांद्रे पूर्व ठाकरे गटाच्या शाखेवर कारवाई केल्याने आक्रमक उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने नागरी प्रश्नांवर जनमत तयार करून पालिका 'एच' पूर्व कार्यालयावर सोमवारी मोर्चा काढला. त्यासाठी गेली तीन दिवस जोरदार तयारी सुरू होती. पाच माजी नगरसेवक या मोर्चात सहभागी झाले होते. पोलिसांनी शिष्टमंडळातील सदस्य सोडून इतरांना प्रवेश नाकारल्याने मोर्चेकरांनी पोलिसांसोबत हुज्जत घातली. तर, मोर्चेकरांनी सरकार पालिका आणि पोलिसांविरोधात जोरदार नारेबाजी केली.

अनिल परब यांचा इशारा

आम्ही बाळासाहेबांचा अपमान कधीच सहन करणार नाही. ज्यांनी अपमान केला, त्यांनी परिणामाला तयार राहिले पाहिजे, असे सांगत उद्या पालिका अधिकाऱ्यांना दाखवतो अनधिकृत बांधकामे कुठे आहेत. हिंमत असेल तर ती तोडा. अन्यथा तुम्हालाच आम्ही तोडतो. असाही इशारा त्यांनी दिला.

टॅग्स :अंबादास दानवेदादा कोंडकेशिवसेनाअनिल परब