आठवडी बाजारावर फेरीवाल्यांची दादागिरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2025 11:09 IST2025-03-17T11:08:14+5:302025-03-17T11:09:35+5:30
साहजिकच काही ठिकाणी स्थानिक गुंडांना घेऊन ते शेतकऱ्यांवर दादागिरी करत असल्याचे शेतकरी उत्पादक कंपन्यांनी सांगितले...

आठवडी बाजारावर फेरीवाल्यांची दादागिरी
योगेश बिडवई, मुख्य उपसंपादक
मागील आठवड्यात ‘लोकमत’ने महामुंबईतील शेतकरी आठवडी बाजारांचा आढावा घेतल्यानंतर त्यात मुंबई, ठाण्यातील काही शेतकरी आठवडी बाजार गुंडांच्या दावणीला बांधले गेल्याचे आढळले. आठवडी बाजारामुळे महामुंबईत ताजा व सकस भाजीपाला मिळू लागल्याने लोक तो खरेदी करण्यास प्राधान्य देत आहेत. त्यामुळे अनधिकृत फेरीवाल्यांचे धाबे दणाणले आहे. साहजिकच काही ठिकाणी स्थानिक गुंडांना घेऊन ते शेतकऱ्यांवर दादागिरी करत असल्याचे शेतकरी उत्पादक कंपन्यांनी सांगितले.
कल्याण आणि टिटवाळा येथे दहशतीमुळे शेतकऱ्यांनी आठवडी बाजार बंद केले. वास्तविक, शेतकऱ्यांना शहरात आठवडी बाजार सुरू करण्यासाठी महापालिकांनी जागा उपलब्ध करून देण्याचे सरकारने आदेश काढले आहेत. शेतकऱ्यांना विक्रेतेे करण्याचे सरकारचे धोरण आहे. मात्र ते केवळ कागदावर असल्याचे दिसते. अन्यथा संत सावता माळी शेतकरी आठवडी बाजार अभियानातून मुंबई, ठाण्यात सुरू झालेले १५ ते २० बाजार बंद पडले नसते. वास्तविक मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई, उल्हासनगर, मीरा-भाईंदर, भिवंडी, वसई-विरार या महापालिका आणि मुंबई महानगर क्षेत्रातील सुमारे चार कोटी लोकसंख्येला किमान एक हजार आठवडी बाजारांची गरज आहे. मात्र ताजा आणि सकस भाजीपाला तसेच फळे महामुंबईकरांना शेतकऱ्यांकडून थेट उपलब्ध होण्यासाठी फारसा कोणी पुढाकार घेताना दिसत नसल्याचे चित्र आहे. नाही म्हणायला, कल्याण-डोंबिवलीत स्थानिक आमदारांनी पुढाकार घेऊन १२ आठवडी बाजार सुरू झाले आहेत. पुणे, अहिल्यानगर, सांगली, सातारा आणि मराठवाड्यातील शेतकरी भाजीपाला व फळे येऊन येतात. मात्र काही ठिकाणी त्यांना स्थानिक गुंडांचा त्रास होतो.
शेतकरी आठवडी बाजार सुरू करण्यासाठी यंत्रणा तयार करावी लागते. मोकळी जागा उपलब्ध झाली म्हणजे बाजार सुरू होईल, असे नाही. शेतकरी गटांना तयार करावे लागते. मुंबई, ठाण्यात भाजीपाला आणायचा म्हणजे शेतकऱ्यांची सकाळी सहापासून लगबग सुरू असते. शेतातून सकाळी भाजीपाला काढून, चार ते पाच तास प्रवास करून तो मुंबईत आणावा लागतो. तेव्हा कुठे चार वाजता येथे बाजार भरतो. त्यानंतर रात्री पुन्हा १० किंवा ११ वाजता निघाल्यानंतर शेतकरी पहाटे ३ ते ४ वाजता घरी पोहोचतो. त्यात शेतकऱ्यांची मोठी मेहनत असते. चार छत्र्या लावल्या म्हणजे बाजार होत नाही. त्यासाठी इकोसिस्टम तयार करावी लागते. ५० शेतकऱ्यांचा गट तयार करून त्यांना सहा दिवस सहा ठिकाणी व्यवस्था करून द्यावी लागते. उत्पन्नाची शाश्वती द्यावी लागते, असे श्री स्वामी समर्थ शेतकरी उत्पादक कंपनीचे संस्थापक नरेंद्र पवार यांनी सांगितले. पवार यांनी महामुंबईत जवळपास १२ आणि पुण्यात ५६ आठवडी बाजार काही वर्षांपासून यशस्वीपणे चालवून दाखवले आहेत.
आठवडी बाजारातून शेतकऱ्यांना लाखोंचे उत्पन्न मिळते असे नाही. त्यांच्यावर दादागिरी करून बाजार बंद पडले तर महामुंबईतील नागरिकांना ताजा आणि सकस शेतमाल मिळणार नाही. त्यामुळे बाजार सुरू करून ते कायमस्वरूपी टिकविण्याची जबाबदारी आपली सर्वांची आहे.