Join us  

दहिसर ज्वेलर्स हत्या आणि दरोडा प्रकरण: 'डोअर लॉक' बटनमुळे सोनाराने गमावला जीव!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 02, 2021 6:41 AM

‘डोअर लॉक’ बटनामुळे गमावला जीव : मास्टरमाइंडचा शोध सुरू

ठळक मुद्देइंदोरच्या जंगलात त्यांनी गोळीबाराची तालीम केली. त्यानंतर दुकानाची रेकी करत पांडे यांचा सहकारी एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी बाहेर गेला तेव्हा संधी साधत ते दुकानात घुसले

मुंबई :  दहिसरच्या ज्वेलर्समध्ये शैलेंद्र पांडे (४६) या सराफाची हत्या करून लूट करण्यात आली होती. त्यांच्या दुकानात असलेल्या ‘डोअर लॉक’ बटनामुळे आपण अडकू या भीतीने  लुटीसाठी आलेल्या आरोपींनी त्यांची हत्या केल्याचे कबूल केले आहे. याप्रकरणी दहिसर पोलिसांनी अवघ्या काही तासात गुजरातच्या सुरत जवळून पाच जणांना अटक केली असून, मास्टरमाइंडचा शोध सुरू आहे. 

या पोलीस पथकाचा सहपोलीस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) विश्वास नांगरे पाटील यांनी सत्कार केला. पांडे यांची हत्या आणि दरोडाप्रकरणी आयुष पांडे (१९), निखिल चांडाल (२१), उदय बाली (२१), चिराग रावल (२१) आणि अंकित महाडिक (२१) या पाच जणांना अटक केली आहे. यात बंटी पाटीदार (२३) नामक इसम हा मास्टरमाइंड असून त्याचा शोध सुरू असल्याचे नांगरे पाटील यांनी सांगितले. याच्यासह आयुष, निखिल व उदय हे मध्य प्रदेशचे असून उर्वरित दहिसरचे स्थानिक आहेत. अंकित हा झोमॅटोमध्ये काम करतो. पाटीदार याने काही काळ पांडे यांच्या दुकानात काम केले होते. त्यामुळे त्यांच्या दुकानातील टेबलच्या खाली एक बटन आहे, जे दाबल्यावर मुख्य दरवाजा लॉक होतो याची त्याला माहिती होती. त्यामुळे त्याने उदय व निखिलला बंदूक पुरवताना दुकानात गेल्यावर पांडे यांना गोळी घाला. अन्यथा ते बटन दाबतील आणि तुम्ही दुकानातच अडकून बसाल असे पाटीदारने त्यांना सांगितल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

इंदोरच्या जंगलात त्यांनी गोळीबाराची तालीम केली. त्यानंतर दुकानाची रेकी करत पांडे यांचा सहकारी एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी बाहेर गेला तेव्हा संधी साधत ते दुकानात घुसले आणि अंकित मागोमाग उदयने पांडेवर गोळीबार केला. ज्यात एक गोळी पांडेंना लागली. ते पाहून पांडेंचे सहकारी दुकानाच्या दिशेने धावले. त्यामुळे तातडीने ॲक्टिवाने तिघे तिथून पळाले व नंतर चोरलेल्या होंडा सिटी कारने सुरत जवळील बारबोधन गावात जाऊन खारफुटीमध्ये त्यांनी दोन बंदुका फेकल्या व लपून बसले. त्यातील एक बंदूक दोन जिवंत कडतुसासह पोलिसांनी हस्तगत केली असून दुसरीचा शोध सुरू आहे. त्यांना ज्याने आसरा दिला त्यालाही ताब्यात घेण्यात आले आहे. तीन आरोपी मंगळवारी मुंबईत आले. त्यानंतर चिराग व अंकितच्या मदतीने त्यांनी कार चोरली. याप्रकरणी परिमंडळ १२चे पोलीस उपायुक्त डॉ. डी.एस. स्वामी आणि दहिसरचे प्रभारी वरिष्ठ  पोलीस निरीक्षक अनिल आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय मराठे, सहायक पोलीस निरीक्षक डॉ. चंद्रकांत घार्गे, ओम तोतावार आणि पथकाने तपास करत काही तासातच आरोपीला जेरबंद केले. ३० तोळे सोने हस्तगत करण्यात आले आहे. 

पळण्यासाठी चोरीच्या मोटारसायकलचा वापरआरोपींवर याआधीदेखील गंभीर गुन्हे दाखल असून त्यांच्यावर एमसीओसी लागण्याची शक्यता आहे. आरोपीचा बूट आणि त्यांचे सोशल मीडिया प्रोफाइलमार्फत पोलिसांना आरोपीजवळ पोहोचण्याचा दुवा मिळाला. दहिसरच्या मानवकल्याण केंद्र येथून आरोपींनी मोटरसायकल चोरी केली होती. तसेच ३० हजार रुपये देऊन त्यांनी दोन बंदुका विकत घेतल्याचीही माहिती आहे.

टॅग्स :गुन्हेगारीमुंबईपोलिस