Join us  

‘ती’ इमारत म्हाडाची नाही; सामंत यांचा पुनरुच्चार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2019 5:11 AM

म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांनी डोंगरी येथील दुर्घटनाग्रस्त इमारत म्हाडाची नसल्याचे बुधवारी पुन्हा सांगितले.

मुंबई : म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांनी डोंगरी येथील दुर्घटनाग्रस्त इमारत म्हाडाची नसल्याचे बुधवारी पुन्हा सांगितले. २५ /सी केसरभाई ही इमारत म्हाडाची उपकरप्राप्त इमारत आहे, मात्र ही इमारत कोसळलेली नसून या इमारतीच्या मागे ट्रस्टने केलेले अनधिकृत बांधकाम कोसळले आहे. याचा म्हाडाशी काहीही संबंध नसल्याचे त्यांनी पुन्हा सांगितले.१९९० साली म्हाडाने या अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यासंबंधी महापालिकेला पत्रही पाठविले होते, मात्र त्यावर कारवाई झाली नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. म्हाडा वसाहतींमध्ये जिथे अनधिकृत कामे करण्यात आली आहेत त्यावर कारवाई करण्याचे आदेश आम्ही गेल्या प्राधिकरणाच्या बैठकीतच दिले आहेत. त्यानुसार कारवाई करण्यात येईल. मात्र पावसाळा असल्याने अनधिकृत घरांवर कारवाई करण्यास बंधने येत असून लवकरच व्यावसायिक बांधकामांवरही कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.>म्हाडाच्या अतिधोकादायक २३ इमारतींचे पुन्हा होणार आॅडिटम्हाडाने या वर्षी पावसाळापूर्व सर्वेक्षणामध्ये मुंबईतील विविध भागांतील २३ इमारती या अतिधोकादायक ठरविल्या आहेत. या २३ इमारतींचे आम्ही पुन्हा आॅडिट करणार असल्याचे म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांनी बुधवारी स्पष्ट केले. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमच्या मागणीवरून जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाबाबतचा जो निर्णय घेतला तो स्वागतार्हआहे, असेही उदय सामंत या वेळी म्हणाले.मोडकळीस आलेल्या इमारतीच्या पावसाळ्यात होणाऱ्या दुर्घटना पाहता या सर्व इमारतींचे तातडीने पुन्हा आॅडिट करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच या इमारतींव्यतिरिक्त सेस असलेल्या इतरही सर्व इमारतींचे आॅडिट करण्याच्या सूचना उपअभियंता तसेच कार्यकारी अभियंत्यांना देण्यात आल्याचेदेखील सामंत यांनी या वेळी अधिक माहिती देताना सांगितले.कॅबिनेटच्या पुढील बैठकीमध्ये सेस इमारतींच्या पुनर्विकासाबाबतचा निर्णय घेण्यात येणार असून याची अंमलबजावणी म्हाडामार्फतकरण्यात येणार आहे. सेसइमारतींच्या पुनर्विकासाबाबत आराखडाही बनविण्यात येणार असून पुढच्या कॅबिनेटमध्ये निर्णय घेण्यात येणार असल्याचे सामंत यांनी सांगितले.

टॅग्स :उदय सामंतम्हाडाइमारत दुर्घटना