बाबा सिद्दीकींच्या हत्येशी ‘बिल्डर लॉबी’चा संबंध नाही; उच्च न्यायालयात पोलिसांचे प्रतिज्ञापत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2026 06:55 IST2026-03-04T06:54:40+5:302026-03-04T06:55:12+5:30

बाबा सिद्दीकी यांची १२ ऑक्टोबर २०२४  रोजी रात्री वांद्रे (पूर्व) येथे त्यांचे पुत्र आणि माजी आ. झिशान सिद्दीकी यांच्या कार्यालयाबाहेर तीन हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली होती.

'Builder lobby' has no connection with Baba Siddiqui's murder; Police affidavit in High Court | बाबा सिद्दीकींच्या हत्येशी ‘बिल्डर लॉबी’चा संबंध नाही; उच्च न्यायालयात पोलिसांचे प्रतिज्ञापत्र

बाबा सिद्दीकींच्या हत्येशी ‘बिल्डर लॉबी’चा संबंध नाही; उच्च न्यायालयात पोलिसांचे प्रतिज्ञापत्र

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे  नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येच्या गुन्ह्यात कथित ‘बिल्डर लॉबी’चा कोणताही प्रकारचा संबंध नसल्याचे मुंबई पोलिसांनी स्पष्ट केले आहे. यासंदर्भात नुकतेच मुंबई उच्च न्यायालयात पोलिसांनी प्रतिज्ञापत्र दाखल केले. संबंधित आरोप ‘केवळ संशय आणि तर्क-कुतर्कांवर आधारित’ असल्याचे पोलिसांनी त्यात नमूद केले.

बाबा सिद्दीकी यांची १२ ऑक्टोबर २०२४  रोजी रात्री वांद्रे (पूर्व) येथे त्यांचे पुत्र आणि माजी आ. झिशान सिद्दीकी यांच्या कार्यालयाबाहेर तीन हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. या घटनेनंतर या गुन्ह्यात बिल्डर लॉबीचाही हात असल्याची चर्चाही केली जात होती. मात्र, न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात पोलिसांनी स्पष्ट केले आहे की, तपासादरम्यान कोणत्याही बिल्डरचा हत्येशी संबंध असल्याचे आढळले नाही. ही हत्या अनमोल बिश्नोईच्या टोळीने दहशत निर्माण करण्यासाठी, वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी व खंडणीसाठी केल्याचे हे निष्पन्न झाले आहे.  

हे प्रतिज्ञापत्र सिद्दीकी यांच्या पत्नी शहझीन सिद्दीकी यांनी दाखल केलेल्या याचिकेच्या उत्तरादाखल सादर करण्यात आले. शहझीन यांनी याचिकेत तपास ‘अपूर्ण व दिशाभूल करणारा’ असल्याचा आरोप करत, स्वतंत्र, निष्पक्ष आणि न्यायालयीन देखरेखीखाली तपास करण्याची मागणी केली होती. 

सिद्दीकी यांच्या पत्नीने केलेले आरोप तथ्यहीन 
शहझीन सिद्दीकी यांनी केलेले सर्व आरोप तथ्यहीन आहेत आणि पोलिस यंत्रणेची प्रतिमा मलिन करण्याच्या हेतूने करण्यात आले आहेत, असे पोलिसांनी न्यायालयासमोर स्पष्ट केले. याचिकेद्वारे पोलिस अधिकाऱ्यांवर दबाव आणण्याचा प्रयत्न  होत असल्याचा दावा प्रतिज्ञापत्रात करण्यात आला आहे.

कायदेशीर प्रक्रियेचे काटेकोर पालन 
वांद्रे ते अंधेरी दरम्यानच्या झोपडपट्टी  पुनर्विकास प्रकल्पांमध्ये रस असलेल्या काही ‘वजनदार’ बिल्डर लॉबीची चौकशी न झाल्याचा आरोप त्यांनी याचिकेत केला होता.
आरोपांवर सहायक पोलिस आयुक्त (सीआयडी) किशोरकुमार शिंदे यांनी प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. तपास कायद्याने निर्धारित प्रक्रियेचे काटेकोर पालन करून व्यावसायिक पद्धतीने करण्यात आला आहे. 
साक्षीदारांचे जबाब, तांत्रिक पुरावे आणि ठोस दस्तऐवजांच्या आधारे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. तसेच, अनमोल बिश्नोईचे अमेरिकेतून भारतात प्रत्यार्पण करण्यासाठी सुरू असलेली कार्यवाही तपास यंत्रणेच्या सातत्यपूर्ण आणि कायदेशीर प्रयत्नांचे यश  आहे, असे प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे.

Web Title : पुलिस: बाबा सिद्दीकी हत्याकांड से बिल्डर लॉबी का कोई संबंध नहीं।

Web Summary : मुंबई पुलिस ने अदालत में स्पष्ट किया कि बाबा सिद्दीकी की हत्या से बिल्डर लॉबी का कोई संबंध नहीं है। जांच में पता चला कि अनमोल बिश्नोई के गिरोह ने रंगदारी और वर्चस्व के लिए अपराध किया। सिद्दीकी की पत्नी की स्वतंत्र जांच की याचिका निराधार बताकर खारिज कर दी गई।

Web Title : Police: Builder lobby not linked to Baba Siddique murder case.

Web Summary : Mumbai Police clarified in court that the builder lobby has no connection to Baba Siddique's murder. Investigation revealed Anmol Bishnoi's gang committed the crime for extortion and dominance. Siddique's wife's petition for an independent inquiry was dismissed as baseless.