Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘देशाला पुढे नेणारी सामर्थ्यशाली पिढी घडवा’; उद्योगपती रतन टाटा यांना डॉक्टरेट प्रदान 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2022 06:33 IST

एचएसएनसी समूह विद्यापीठ ही एक दूरदर्शी संकल्पना असून विद्यापीठांनी नीतीमत्ता व मानवी मूल्ये यांच्या वाटेने देशाला पुढे नेणारी सामर्थ्यशाली युवा पिढी घडवावी

मुंबई :एचएसएनसी समूह विद्यापीठ ही एक दूरदर्शी संकल्पना असून विद्यापीठांनी नीतीमत्ता व मानवी मूल्ये यांच्या वाटेने देशाला पुढे नेणारी सामर्थ्यशाली युवा पिढी घडवावी, अशी अपेक्षा टाटा समूहाचे अध्वर्यु रतन टाटा यांनी व्यक्त केली.

नव्याने स्थापन झालेल्या एचएसएनसी समूह विद्यापीठाच्या पहिल्या विशेष दीक्षांत समारोहात राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते शनिवारी राजभवन येथे टाटा समूहाचे अध्वर्यु रतन टाटा यांना मानद डॉक्टर आॅफ लिटरेचर ही पदवी प्रदान करण्यात आली; यावेळी रतन टाटा बोलत होते.

भगतसिंह कोश्यारी यावेळी म्हणाले की, रतन टाटा हे केवळ उद्योगपती किंवा कॉर्पोरेट जगताचे प्रमुखच नाहीत तर ते त्याहीपेक्षा विनम्रता, मानवता व नीतीमूल्ये जपणारे श्रेष्ठ व्यक्ती असून नव्या उद्योजकांसाठी दीपस्तंभ आहेत. रतन टाटा यांनी मानद पदवी स्वीकारून विद्यापीठाचा तसेच उपस्थितांचा गौरव वाढवला. टाटा यांचा सन्मान हा संपूर्ण टाटा समूहाचा तसेच टाटा घराण्याचा सन्मान आहे.

दरम्यान, याप्रसंगी विद्यापीठाचे मुख्य संरक्षक डॉ. निरंजन हिरानंदानी, उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकास चंद्र रस्तोगी, एचएसएनसी बोर्डाचे अध्यक्ष अनिल हरीश, माजी अध्यक्ष किशु मानसुखानी व कुलगुरु डॉ. हेमलता बागला उपस्थित होते.

टॅग्स :रतन टाटा