Join us  

Budget 2021: "उद्धव ठाकरे यांनी हातात कागद न घेता अर्थसंकल्पावर 30 मिनिटं बोललं पाहिजे"

By मुकेश चव्हाण | Published: February 01, 2021 4:45 PM

भाजपाचे खासदार नारायण राणे यांचे पुत्र आणि माजी खासदार निलेश राणे यांनी देखील केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पाचे कौतुक केलं आहे.

मुंबई/ नवी दिल्ली: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2021-22 या वर्षांचा देशाचा अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी कोरोना कालावधीत आणि लॉकडाऊन दरम्यान सरकारनं केलेल्या कामगिरीची माहिती दिली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षीचा अर्थसंकल्प हा वेगळा होता. यावेळी कोणत्याही कागदपत्रांशिवाय टॅबच्या सहाय्यानं हा अर्थसंकल्प मांडण्यात आला. सुरुवातीलाच लॉकडाऊन आणि कोरोना संदर्भात माहिती देताना केंद्र सरकारने दिलेल्या योजनांचाही निर्मला सीतारामन यांनी उल्लेख केला. 

निर्मला सीतारामन अर्थसंकल्पानंतर विरोधकांकडून टीका करण्यात येत आहे. तर  सत्ताधाऱ्यांकडून कौतुक केलं जात आहे. भाजपाचे खासदार नारायण राणे यांचे पुत्र आणि माजी खासदार निलेश राणे यांनी देखील केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पाचे कौतुक केलं आहे. तसेच या कौतुकासोबत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टोलाही लगावला आहे. 

निलेश राणे ट्विट करत म्हणाले की, देशाचा बजेट आज जाहीर झाला. मागचं वर्ष संकटात गेलं तरी यंदाचा अर्थसंकल्प धाडसी आहे. तसेच अर्थव्यवस्थेला चालना देणारा आहे, असं म्हणत कौतुक केलं आहे. तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेऊन, हातात कागद न घेता अर्थसंकल्प विषयावर 30 मिनिटं बोललं पाहिजे, असा टोला निलेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे. 

दरम्यान, निर्मला सीतारामन यांनी मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्ममधील तिसरा अर्थसंकल्प सादर केला. कोरोना प्रादुर्भावामुळे मंदावलेली अर्थव्यवस्था, घसरलेला विकासदर यांच्या पार्श्वभूमीवर हा अर्थसंकल्प सादर झाला. केंद्र सरकारने यंदाच्या अर्थसंकल्पात टॅक्स स्लॅबमध्ये कोणताही बदल केलेला नाही.  75 वर्षांपेक्षा अधिक वय असणाऱ्या आणि ज्यांना निवृत्तीवेतन मिळते त्यांचा कर माफ करण्यात आला आहे. तसेच, भारत पेट्रोलियम, आयडीबीआय बँक आणि एअर इंडिया यामध्ये निर्गंतवणूक करण्यात येणार असल्याची घोषणा निर्मला सीतारामन यांनी केली.  

फडणवीसांकडून अर्थमंत्र्यांचे आभार-

अर्थसंकल्पात महाराष्ट्रातील नाशिक आणि नागपूरच्या मेट्रो प्रकल्पांची घोषणा करण्यात आल्यानंतर भाजपाचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरच्या माध्यमातून नागपूर आणि नाशिककरांचे अभिनंदन केले आहे. तसंच, केंद्र सरकारनं नाशिक मेट्रोचं मॉडेल स्वीकारलं ही आनंदाची बाब आहे. नाशिक मॉडेल देशातील इतर शहरांमध्ये स्वीकारलं जाईल. हे विकासाचे आणि नवनिर्माणाच्या धोरणाचे यश आहे. नाशिक मेट्रोसाठी 2092 कोटी आणि नागपूर मेट्रो दुसऱ्या टप्प्यासाठी 5976 कोटी रुपये आत्मनिर्भर भारत अतंर्गत देण्यात आल्याची माहित देत देवेंद्र फडणवीसांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि  केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे आभार मानले आहेत.

टॅग्स :बजेट 2021उद्धव ठाकरेनिलेश राणे शिवसेनाभाजपामहाराष्ट्र सरकारकेंद्र सरकार