मुंबई - नैसर्गिक विधीसाठी घराबाहेर पडलेला नऊ वर्षांचा मुलगा ट्रेनने कुर्ला रेल्वे स्थानकात उतरला. रेल्वे ब्रिजवरून एकटा फिरत असलेल्या मुलाकडे विकृताची नजर पडली. खाऊचे आमिष देत आरोपीने मुलाला निर्जनस्थळी नेले. तेथे त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार केले. यादरम्यान मुलगा ओरडत असताना त्याचा चेहरा जमिनीवर मातीत दाबून त्याची निर्घृण हत्या केली. याप्रकरणी हत्येचा गुन्हा नोंदवत चुनाभट्टी पोलिसांनी सीसीटीव्हीच्या मदतीने मोहम्मद सलमान अनुसरूल हक (१९) आरोपीला अटक केली आहे.
धारावीत आई - वडील आणि चार भावंडांसोबत चिमुकला राहण्यास होता. बुधवारी रात्री नैसर्गिक विधीसाठी जातो, असे सांगून तो बाहेर पडला. पुढे फिरत स्टेशन गाठले. तेथून ट्रेनने कुर्ला स्थानकात उतरला. ब्रिजवर भटकत असताना बिहारच्या हकची नजर त्याच्यावर पडली. त्याने खाऊ आणि पैशांचे आमिष देत सोबत नेले. गप्पा मारत कुर्ला पूर्वेकडील स्वदेशी मिल रोड येथील निर्जनस्थळी नेले. तेथे मुलावर अनैसर्गिक अत्याचार केले. मुलाने त्याला विरोध करताच त्याला मारहाण केली. त्याचा गळा दाबून चेहरा मातीत दाबण्याचा प्रयत्न केला. अखेर, मुलाने प्राण सोडले. आरोपीने त्याला तेथेच सोडून पळ काढला. रात्री उशिराने मुलाबाबत माहिती मिळताच चुनाभट्टी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
...असा घेतला शोध मुलगा बेपत्ता झाल्याने कुटुंबीयांनी शोध सुरू केला. त्यात, मृतदेह हाती लागल्याने पोलिसांनी सीसीटीव्हीच्या मदतीने आरोपीचा शोध सुरू केला. त्याआधारे पोलिसांनी आरोपीला बुधवारी रात्री उशिराने अटक केली. हक हा मूळचा बिहारमधील मोधापूर, चंपाचा रहिवासी आहे. तो सध्या ठाण्यातील भिवंडी परिसरात राहात होता. आरोपीची गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासण्यात येत असल्याचे पोलिस उपायुक्त नवनाथ ढवळे यांनी सांगितले.
मुलाच्या अंगावर जखमामृत मुलाचा मृतदेह सापडल्यानंतर चुनाभट्टी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मुलाला सायन रुग्णालयात नेले. येथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. मुलाच्या संपूर्ण अंगावर जखमा असून, आरोपीने मुलाची हत्या करण्यापूर्वी त्याला मारहाण करून हत्या केल्याचे समोर आले. मुलगा धारावीतील असल्याचे स्पष्ट होताच पोलिसांनी त्याच्या कुटुंबीयांना याबाबत कळवले.