Join us  

CoronaVirus लॉकडाऊनचा असाही फायदा; ब्रिटिशकालीन अमृतांजन पूल पाडणार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 02, 2020 6:20 PM

द्रुतगती मार्गावरील वाहतूकही मोठ्या प्रमाणावर सुरु असल्याने हा पूल पाडणे अशक्य बनले होते. सध्या कोरोनामुळे ल़ॉकडाऊन असल्याने केवळ सरकारी आणि अत्यावश्यक मालवाहतूक करणारी वाहने जात आहेत.

मुंबई : कोरोना व्हायरसमुळे देशभरात लॉकडाऊन झाले आहे. महाराष्ट्रात आधीच लॉकडाऊन जाहीर करण्यात आले होते. मात्र, सारे काही बंद ठेवूनही रुग्णांची संख्या कमालीची वाढत आहे. यामुळे राज्य सरकार तणावाखाली आहे. अशातच या लॉकडाऊनचा फायदाही होणार आहे. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील जुना मोडकळीस आलेला पूल पाडण्यात येणार आहे. 

मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर ४५.५००  अंतरावर ब्रिटीशकालीन अमुतांजन पूल आहे. हा पूल जुना आणि धोकादायक असल्याने काही वर्षांपासून वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. मात्र, या पुलाखालून एक्स्प्रेस वे जात असल्याने तो पाडता येत नव्हता. तसेच ऐन घाटामध्ये खंडाळ्याच्या अलीकडे या पूलाच्या खांबांची अडचण होत असल्याने वळण आणि रस्ताही अरुंद आहे. यामुळे हे ठिकाण अपघाताचे आणि वाहतूक कोंडीचे केंद्र बनलेले आहे. 

द्रुतगती मार्गावरील वाहतूकही मोठ्या प्रमाणावर सुरु असल्याने हा पूल पाडणे अशक्य बनले होते. सध्या कोरोनामुळे ल़ॉकडाऊन असल्याने केवळ सरकारी आणि अत्यावश्यक मालवाहतूक करणारी वाहने जात आहेत. यामुळे वाहतूक खूपच तुरळक असल्याने हा पूल पाडण्यास परवानगी घेण्यात आली आहे. याबाबत जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी रायगड यांना माहिती देत त्यांच्याकडून अमृतांजन ब्रीज पाडण्याची परवानगी रस्ते विकास महामंडळ महाराष्ट्र राज्य यांनी घेतली आहे. यामुळे हा अमृतांजन पूल ४ एप्रिल ते १४ एप्रिल या काळात स्फोटकांचा वापर करून पाडण्यात येणार आहे.

वाहतुकीत बदल यामुळे हा रस्ता बंद राहणाऱ असल्याने या काळात वाहतूक किमी ४४ (अंडा पॉईंट) वरून जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर वळविण्यात येणार आहे. ही वाहतूक खंडाळा लोणावळा शहरातून किमी ५५ वर असलेल्या एक्झिटला बाहेर पडणार आहे. मुंबईकडे येणारी वाहतूकही उलट दिशेने सुरु जुन्या महामार्गावरून सुरु राहणार आहे. 

टॅग्स :अमृतांजन घाटकोरोना वायरस बातम्यामुंबई-पुणे एक्सप्रेस वे