प्रत्येक क्षेत्रात सर्जनशीलता, नवकल्पना आणि उत्कृष्टता आणावी - राज्यपाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2019 03:53 IST2019-01-06T03:52:52+5:302019-01-06T03:53:15+5:30
१५० वा वर्धापन दिन : सेंट झेविअर्सच्या माजी विद्यार्थ्यांचा ‘झेविअर्स रत्न’ अवॉर्डने सन्मान

प्रत्येक क्षेत्रात सर्जनशीलता, नवकल्पना आणि उत्कृष्टता आणावी - राज्यपाल
मुंबई : शिक्षण, आरोग्य, शेती आणि उद्योग या क्षेत्रातील प्रगतीमुळे आज लोकांचे जीवनमान सुधारण्यास यश मिळत आहे. आजच्या घडीला भारताला एक अशी शिक्षण व्यवस्था अपेक्षित आहे जी प्रत्येक क्षेत्रात चांगली विचारसरणी निर्माण करेल. येणाऱ्या काळात प्रत्येक क्षेत्रात सर्जनशीलता, नवकल्पना आणि सर्वांत महत्त्वाची असलेली उत्कृष्टता आणावी, असे आवाहन राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी केले. सेंट झेविअर्स हायस्कूलच्या १५० व्या वर्धापन दिनानिमित्त माजी विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. या सत्कार समारंभ कार्यक्रमास राज्यपाल सी. विद्यासागर राव यांची प्रमुख उपस्थिती होती.
पोस्ट खात्याकडून सेंट झेविअर्स हायस्कूलच्या १५० व्या वर्धापन दिनानिमित्त तयार करण्यात आलेल्या विशेष कव्हरचे राज्यपाल विद्यासागर राव यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. स्वातंत्र्यपूर्व काळात भारतात साक्षरतेचा दर १२ टक्के होता. आज साक्षरतेचा दर ४० टक्के इतका झाला आहे. हा प्रगतीचा आकडा खरोखरच उल्लेखनीय असल्याचे राज्यपालांनी म्हटले. विद्यार्थ्यांनी कौशल्यपूर्ण शिक्षण घेणे आवश्यक आहे. शाळेची उत्कृष्टता सिद्ध करण्यासाठी प्रत्येक शाळेने कार्यरत राहणे आवश्यक असून समाजाच्या वाढत्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी शाळांनी आपले काम नेकीने सुरू ठेवणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. सोबतच शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी शाळांच्या परिवर्तन आणि पुनरुत्थानामध्ये अधिक सक्रिय भूमिका निभावली पाहिजे, अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली.
सेंट झेविअर्स रत्न : सेंट झेविअर्स शाळेतील माजी विद्यार्थ्यांची यादी पाहता मला अभिमान वाटतो; कारण या यादीतील सर्वच माजी विद्यार्थी गुणवंत असल्याचे राज्यपाल म्हणाले. या शाळेने स्वातंत्र्य सैनिक, उद्योगपती, खेळाडू, नेते देशाला दिले आहेत. या वेळी माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण, आदी गोदरेज, दीपक पारेख, डॉ. एरीक बोरजेस आणि क्रिकेटपटू सुनील गावसकर यांना झेवियर्स रत्न अवॉर्डने सन्मानित करण्यात आले.
मुलांचा सर्वांगीण विकास आवश्यक
आज खेळ खेळण्याऐवजी विद्यार्थी इलेक्ट्रॉनिक गॅझेटवर जास्त वेळ घालवत आहेत हे चित्र चिंताजनक आहे. यामुळे विद्यार्थ्यांचा त्यांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. मुलांमध्ये लठ्ठपणा वेगाने वाढत आहे. विद्यार्थ्यांच्या संपूर्ण व्यक्तिमत्त्वाचा विकास करण्यासाठी संगीत, नृत्य, कला आणि इतर उपक्रमांवर समान भर देणे आवश्यक आहे. त्यामुळे शाळांनी व पालकांनी आपली मुले अभ्यासाबरोबरच मैदानी खेळाकडेही लक्ष देत आहेत का याकडे लक्ष द्यावे, असे आवाहन राज्यपालांनी केले.