जहाजाच्या पुढील प्रवासाला ना हरकत देण्यासाठी लाचखोरी ; पोर्ट विभागाच्या ३ कॅप्टनसह दोघे सीबीआयच्या जाळ्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2025 06:03 IST2025-07-02T06:02:15+5:302025-07-02T06:03:33+5:30

एका मालवाहू जहाजाला मुंबईतून बाहेर पडण्यासाठी आवश्यक ना-हरकत प्रमाणपत्र देण्यासाठी सहा हजार अमेरिकी डॉलर इतकी लाच स्वीकारल्याप्रकरणी कारवाई केली.

Bribery to prevent ship from proceeding Two along with 3 captains of the port department in CBI's net | जहाजाच्या पुढील प्रवासाला ना हरकत देण्यासाठी लाचखोरी ; पोर्ट विभागाच्या ३ कॅप्टनसह दोघे सीबीआयच्या जाळ्यात

जहाजाच्या पुढील प्रवासाला ना हरकत देण्यासाठी लाचखोरी ; पोर्ट विभागाच्या ३ कॅप्टनसह दोघे सीबीआयच्या जाळ्यात

मनोज गडनीस

मुंबई : एका मालवाहू जहाजाला मुंबईतून बाहेर पडण्यासाठी आवश्यक ना-हरकत प्रमाणपत्र देण्यासाठी सहा हजार अमेरिकी डॉलर इतकी लाच स्वीकारल्याप्रकरणी मुंबई पोर्ट ऑथोरिटीचे तीन कॅप्टन दर्जाचे अधिकारी व एका खासगी कंपनीचा अधिकारी व कंपनीविरोधात मुंबईत सीबीआयच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे. कॅप्टन अभिषेक सिंग (पायलट), कॅप्टन संजय खांडवे (डॉक मास्टर), कॅप्टन उमेश ओक (डॉक मास्टर), बेन लाईन एजन्सीचा वरिष्ठ व्यवस्थापक थॉमस डिसोझा अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.

पोर्ट ऑथोरिटी विभागात लाचखोरी नवीन नसली तरी या प्रकरणातील लाचखोरीचे कथानक रंजक आहे. ‘एमव्ही अल करामा’ हे मालवाहू जहाज मुंबईत आल्यानंतर त्याला योग्य ठिकाणी पार्किंग देण्यासाठी कॅप्टन अभिषेक सिंग हे पायलट म्हणून त्या जहाजावर पोहोचले आणि त्यांनी त्या जहाजाला नमूद ठिकाणी पार्किंग दिले. त्यानंतर जहाजातून निघत असताना त्यांनी आपला पाय मुरगळला असल्याचे नाटक केले आणि त्याने मग डॉक मास्टर स्टेशनच्या कार्यालयात दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांची ड्युटी संपेपर्यंत मुक्काम केला.

दरम्यानच्या काळात जहाजातील माल उतरवण्याचे काम पूर्ण झाले आणि त्यांनी कॅप्टन अभिषेक सिंग यांच्याकडे मुंबई पोर्ट सोडण्यासाठी ना-हरकत प्रमाणपत्र मागितले. हे प्रमाणपत्र देण्यासाठी सिंग याने या जहाजाच्या एजंटकडे सहा हजार अमेरिकी डॉलर इतक्या रकमेची मागणी केली. यावरून त्यांच्यात बरीच चर्चा झाली. मात्र, सिंग सहा हजार अमेरिकी डॉलरच्या मागणीवर ठाम राहिले.

अखेरीस संबंधित एजंटने जहाजाच्या कंपनीशी संपर्क साधत या पैशांची तजवीज केली. सिंग याने हे लाचेचे पैसे आपल्या मेव्हणाच्या पत्नीच्या फिरोजाबाद येथील बँक खात्यात स्वीकारले.

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोर्ट ऑथोरिटीच्या दक्षता विभागाने याची चौकशी केली. या लाचखोरीमध्ये पोर्ट ऑथोरिटीचे अन्य दोन कॅप्टनदेखील सहभागी असल्याचे दिसून आले.

कंपनीच्या अधिकाऱ्यांवरही गुन्हा

सरकारी अधिकाऱ्याला लाच दिली म्हणून कंपनी व लाच देणारा कंपनीचा अधिकारी यांच्याविरोधात देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोर्ट विभागाच्या दक्षता अधिकाऱ्याने केलेल्या चौकशीनंतर त्यांनी या प्रकरणी सीबीआयकडे तक्रार दाखल केली आहे. सीबीआयचे अधिकारी आता या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Web Title: Bribery to prevent ship from proceeding Two along with 3 captains of the port department in CBI's net

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.