तावडेंच्या उपस्थितीत नियमभंग

By Admin | Updated: September 1, 2015 03:07 IST2015-09-01T03:07:58+5:302015-09-01T03:07:58+5:30

सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे आणि मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांनी मोठा गाजावाजा करत रविवारी बोरीवली-वांद्रे येथे पहिल्यावहिल्या दहीहंडी

Breach of rules in the presence of a pawn | तावडेंच्या उपस्थितीत नियमभंग

तावडेंच्या उपस्थितीत नियमभंग

मुंबई : सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे आणि मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांनी मोठा गाजावाजा करत रविवारी बोरीवली-वांद्रे येथे पहिल्यावहिल्या दहीहंडी साहसी खेळ स्पर्धेचे आयोजन केले. मात्र या स्पर्धांमध्ये हंडीची उंची, बालगोविंदा सहभाग आणि डीजेचा आवाजाचे सर्व नियम धाब्यावर बसविल्याचा आरोप राष्ट्रवादीचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी केला आहे. तसेच आता हेच शासनाचे धोरण समजून आम्हीही हेच अवलंबायचे का, असा सवाल अहिर यांनी उपस्थित केला आहे.
युथ कल्चरल असोसिएशनतर्फे रविवारी बोरीवलीत आणि मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार आयोजित वांद्रे या दोन्ही ठिकाणी ही स्पर्धा पार पडली. या वेळी सहभागी झालेल्या गोविंदा पथकांनी या ठिकाणी सर्रास पाच-सहा थरांचे मनोरे रचले. शिवाय, सहभागी झालेल्या पथकांमध्ये हंडी फोडण्यासाठी ‘एक्क्याच्या’ स्थानावर बालगोविंदांचा थेट सहभागही दिसून आला. परंतु, न्यायालयाचे निर्बंध मोडत असल्याची पुसटशी जाणीवही सांस्कृतिक कार्यमंत्र्यांना झाल्याचे त्यांच्या देहबोलीतून जाणवले नाही. तसेच डीजेच्या आवाजाने डेसिबलच्या मर्यादेचेही उल्लंघन केले.
दहीहंडीला साहसी खेळाचा दर्जा दिल्यानंतर सहभागी होणाऱ्या गोविंदांना चेस्टगार्ड, हेल्मेट, सेफ्टी बेल्ट आदींचा वापर बंधनकारक करण्यात आला आहे. सर्व खेळाडूंचा विमा, तसेच प्रत्येक खेळाडू स्वत:च्या जबाबदारीवर स्पर्धेत सहभागी होत असल्याचे त्याचे हमीपत्र पथकांनी आयोजकांना द्यावे लागेल. त्याचप्रमाणे १२ ते १५ वर्षे वयोगटातील मुलांना चारपासून वरच्या थरांवर उभे राहायचे असल्यास त्याबाबत पालकांची लेखी परवानगी गोविंदा पथकांच्या व्यवस्थापनाकडे असणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच १२ वर्षांखालील मुलांना हा खेळ खेळण्यास बंदी घालण्यात आली आहे.
दहीहंडीचे आयोजन करणाऱ्यांना त्या ठिकाणी तातडीचे वैद्यकीय पथक, मॅट अंथरणे, पाण्याची व्यवस्था, मोबाइल टॉयलेट व्हॅन, पोलीस बंदोबस्त, सुरक्षा व्यवस्थेची जबाबदारी घ्यावी लागेल. एवढेच नव्हे तर ज्या ठिकाणी दहीहंडी बांधण्यात येणार आहे, त्या जागेसाठी अग्निशमन दल, पोलीस, वाहतूक पोलीस आणि परिवहन खात्याचीही परवानगी घ्यावी लागेल. मात्र, या नियमावलीच्या बाहेर जाऊन जर कोणी स्पर्धांचे आयोजन करणार असेल, तर तो साहसी क्रीडाप्रकार म्हणून गणला जाणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले होते. थरांच्या उंचीच्या वादात सरकार पडणार नाही, अशी भूमिका तावडेंनी घेतली होती. या संदर्भात सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांची प्रतिक्रिया मिळाली नाही. (प्रतिनिधी)

Web Title: Breach of rules in the presence of a pawn

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.