कुलगुरूंच्या चहापानावर बहिष्कार; युवा सेना, बुक्टू संघटनेच्या सदस्यांचा पवित्रा, विद्यापीठाची अर्थसंकल्पीय सिनेट वादळी ठरणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2025 13:49 IST2025-03-19T13:47:48+5:302025-03-19T13:49:47+5:30
सिनेट सदस्यांची बैठक दोन वर्षांनी होत असल्याने विद्यापीठाच्या गोंधळी कारभारावर वादळी चर्चा होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

कुलगुरूंच्या चहापानावर बहिष्कार; युवा सेना, बुक्टू संघटनेच्या सदस्यांचा पवित्रा, विद्यापीठाची अर्थसंकल्पीय सिनेट वादळी ठरणार
मुंबई : सुमारे अडीच वर्षांच्या खंडानंतर होणारी मुंबई विद्यापीठाची शनिवारी होणारी अर्थसंकल्पीय सिनेट बैठक वादळी ठरण्याची दाट शक्यता आहे. विद्यापीठाने सिनेट बैठकीच्या पार्श्वभूमीवर आज, बुधवारी सिनेट सदस्यांसाठी आयोजित केलेल्या चहापान सदिच्छा बैठकीवर युवा सेनेबरोबरच बुक्टू या प्राध्यापक संघटनेच्या सिनेट सदस्यांनी बहिष्कार टाकला आहे. त्यामुळे सिनेट बैठकीत या संघटनांचे सदस्य विद्यापीठाच्या कारभाराचे वाभाडे काढतील, अशी चर्चा आहे. सिनेटवर युवा सेनेचे दहा, तर बुक्टूचे ८ सदस्य आहेत.
युवा सेनेच्या सिनेट सदस्यांनी विद्यापीठ प्रशासनाला धारेवर धरण्याची जय्यत तयारी केली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. त्यात विद्यापीठाने यंदा दोन दिवसांऐवजी एक दिवसीय बैठक आयोजित केली आहे. तसेच अनेक सिनेट सदस्यांचे विषय बैठकीच्या विषयपत्रिकेतून वगळण्यात आले आहेत. त्यामुळे विद्यापीठाविरोधात सदस्य आक्रमक झाले आहेत.
सिनेट सदस्यांची बैठक दोन वर्षांनी होत असल्याने विद्यापीठाच्या गोंधळी कारभारावर वादळी चर्चा होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
अर्थसंकल्पीय सभेसाठी दिलेल्या प्रश्नांमध्ये कुलगुरुंनी काटछाट केली आहे. त्याचबरोबर विद्यापीठाने कुलपतींकडून बैठकीसाठी दोन दिवसांऐवजी एक दिवसाची परवानगी घेतली. याचा निषेध म्हणून युवासेनेचे पदवीधर मतदारसंघातून निवडलेले सर्व सिनेट सदस्य सिनेटपूर्व चहापानावर बहिष्कार टाकणार आहेत.
प्रदीप सावंत, सिनेट सदस्य, युवासेना
मुंबई विद्यापीठाने बुक्टूच्या सिनेटर्सनी विचारलेल्या अनेक प्रश्नांना उत्तर दिलेली नाहीत. गेल्या सहा महिन्यांत विविध महाविद्यालयांतील प्रश्नांवर संघटनेला दिलेली आश्वासने विद्यापीठाने पाळलेली नाहीत. केवळ वेळ मारून नेण्यासाठी आश्वासने देणे आणि ती न पाळणे या कुलगुरूंच्या दुटप्पी भूमिकेचा निषेध म्हणून चहापानावर टाकला आहे.
प्रा. डॉ. गुलाबराव राजे, अध्यक्ष, बुक्टू