Join us
Daily Top 2Weekly Top 5

दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र, पण सरसकट घड्याळ चिन्हावर लढणार नाहीत- शशिकांत शिंदे

By यदू जोशी | Updated: January 21, 2026 12:50 IST

प्राबल्य असलेल्या ठिकाणी तुतारी चिन्ह घेऊनच लढणार

यदु जोशी, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: जिल्हा परिषदेची आगामी निवडणूक राष्ट्रवादीचे दोन्ही गट सरसकट घड्याळ चिन्हावर लढण्याची शक्यता नाही, काही ठिकाणी दोन्ही चिन्हांवर निवडणूक लढविली जाईल, अशी शक्यता राष्ट्रवादीचे (शरद पवार) प्रदेशाध्यक्ष आ. शशिकांत शिंदे यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.

२०२३ मधील फाटाफुटीनंतर दोन्ही गट काही महापालिकांमध्ये एकत्र लढले होते; पण अजित पवार गटाचे उमेदवार घड्याळावर तर शरद पवार गटाचे उमेदवार तुतारीवर लढले. मात्र, त्याचा फारसा फायदा झाला नाही. राष्ट्रवादीचे चिन्ह म्हणजे घड्याळ हे गेल्या २६ वर्षांमध्ये मतदारांवर बिंबवले गेले आहे, त्याचा फायदा अजित पवार गटाला झाला, असे  म्हटले जात आहे.

शशिकांत शिंदे याबाबत म्हणाले की, जिल्हा परिषद निवडणूक ही घड्याळ चिन्हावरच लढवावी, असा प्रयत्न आहे. त्यानुसार बहुतेक ठिकाणी ते शक्य होईल, अशी आमची अपेक्षा आहे; पण काही तालुके असे आहेत की जिथे राष्ट्रवादीच्या दोन गटांचेच नेते प्रभावी आहेत. तिथे आमच्या पक्षाचे नेते हे घड्याळ चिन्ह घेण्यास तयार नाहीत. त्यांच्या उमेदवारांनी घड्याळ चिन्ह घेण्यास अजित पवार गटाच्या स्थानिक नेत्यांकडूनही विरोध होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा ठिकाणी दोन्ही चिन्हांवर उमेदवार लढतील.शरद पवार गटाचे जे उमेदवार घड्याळ चिन्ह घेतील त्यांचा पक्ष आपोआप बदलेल आणि ते अजित पवार गटाचे होतील.

महिनाअखेर विलीनीकरण, पण अद्याप निर्णय नाहीच

तुतारीऐवजी घड्याळ चिन्ह घेऊनच लढा, असा आग्रह राष्ट्रवादीतून (शरद पवार) धरला जात आहे. तुतारीवर अलीकडची महापालिका निवडणूक लढणाऱ्या काही महत्त्वाच्या स्थानिक नेत्यांनी जिल्हा परिषद निवडणूक ही घड्याळावर लढण्याचा आग्रह धरला आहे. तुतारी हे चिन्ह मतदार चटकन स्वीकारत नाहीत. तुतारीपेक्षा घड्याळ चिन्ह अधिक अपील होते, असे या नेत्यांचे म्हणणे आहे. खा.सुप्रिया सुळे म्हणाल्या की राष्ट्रवादीत कोण कुठल्या चिन्हावर उभे राहत आहे हे कळेल.

सावध भूमिका

राष्ट्रवादीच्या दोन गटांचे चालू महिनाअखेर विलीनीकरण होणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. चालू महिनाअखेर हे विलीनीकरण होणार का, या प्रश्नावर आ. शशिकांत शिंदे यांनी तसा निर्णय अद्याप झाला नसल्याचे सांगत सावध भूमिका घेतली.

English
हिंदी सारांश
Web Title : NCP Factions Together, But Not All Will Fight on Clock Symbol

Web Summary : NCP factions may contest upcoming elections on both 'clock' and 'tutari' symbols. Some leaders prefer the clock, but local dynamics could lead to varied symbol usage. Merger decision pending, says Shinde.
टॅग्स :मुंबईराष्ट्रवादी काँग्रेस