बोरीवलीत आहे मुंबईतील सर्वात उंच ठिकाण; दिसतात तीन तलाव, ३६० अंशांत दिसू शकते मुंबई

By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2023 01:03 PM2023-09-04T13:03:17+5:302023-09-04T13:03:48+5:30

-संजीव साबडे मुंबईच्या उपनगरांकडे आणि तेथील ऐतिहासिक वास्तूंकडे सरकारी यंत्रणा आणि आपलंही खूप दुर्लक्ष झालं आहे. बोरीवली हे पश्चिम ...

Borivali is the highest point in Mumbai; Three lakes are visible, Mumbai can be seen in 360 degrees | बोरीवलीत आहे मुंबईतील सर्वात उंच ठिकाण; दिसतात तीन तलाव, ३६० अंशांत दिसू शकते मुंबई

बोरीवलीत आहे मुंबईतील सर्वात उंच ठिकाण; दिसतात तीन तलाव, ३६० अंशांत दिसू शकते मुंबई

googlenewsNext

-संजीव साबडे

मुंबईच्या उपनगरांकडे आणि तेथील ऐतिहासिक वास्तूंकडे सरकारी यंत्रणा आणि आपलंही खूप दुर्लक्ष झालं आहे. बोरीवली हे पश्चिम उपनगरांतील एका मोठ्या तालुक्याचं मुख्यालय. तिथल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात बहुसंख्य मुंबईकर जातात; पण अजिंठा व वेरुळची लेणी पाहायला जाणारे लोक येथील बौद्धकालीन लेण्यांकडे फारसे फिरकत नाहीत. इतक्या मोठ्या समृद्ध सांस्कृतिक वास्तूच्या आत काय काय आहे त्या कधी निर्माण केल्या याची माहितीही अनेकांना नसते. बोरीवली स्टेशनहून पूर्वेच्या दत्तपाड्याकडे जाताना टाटा स्टीलपाशी, उजवीकडे मागाठाणे येथेही बौद्धकालीन लेण्या आहेत. त्यांची स्थिती अशी की त्या शोधाव्या लागतात. बहुसंख्य स्थानिकांनाही आपल्या बोरीवलीत अशा लेणी आहे, हेच माहीत नाही. तिथे बौद्ध साधकांसाठी मठ होता. त्यातून या भागाला मग्गस्थानक व मग्गठाणे असं नाव पडलं. त्याचा अपभ्रंश मागाठाणे असा झाला. आता त्याच्या चहूबाजूने इतकी वस्ती व बांधकामं झाली आहेत की गुंफा व आतील लेण्या शोधणं अवघड झालं आहे.

पश्चिमेला मंडपेश्वर गुंफा आहे. पोयसर नावाच्या डोंगराच्या पायथ्याशी त्याच पोयसर नावाची नदी होती. पुढे नदीचा प्रवाह बदलला. आता तिथे डोंगरही दिसत नाही; पण तो सारा भाग डोंगराळ असल्याचं लगेच लक्षात येतं. मंडपेश्वर , गुंफाही बौद्धकालीन; पण आता तिथं शिव लेण्या आहेत. पोर्तुगीजांनी तिथे तोडफोड करून चर्च उभारलं. या गुंफात त्रिपुरी पौर्णिमेला मोठा दीपोत्सव होतो. तो पाहायला शेकडो लोक जातात. दीपोत्सवाची छायाचित्रंही प्रकाशित होतात; पण या किंवा कान्हेरी व मागाठाणे गुंफांविषयी अनास्थाच अधिक दिसते. मुंबईकर गोराई बीचवर जातात, एस्सेल वर्ल्डमध्ये जाण्यासाठी मोठी रक्कम मोजतात, पण या लेण्या . पाहायला जाणाऱ्यांची संख्या खूपच कमी आहे.

बोरीवलीत तहसील कार्यालय

बोरीवलीला तहसीलदार कार्यालय कुठं आहे, हे बऱ्याच जणांना माहीत नाही पण बोरीवलीत वर्षानुवर्ष राहणाऱ्या अनेकांना एक्सर, शिपोली, मागाठाणे, कान्हेरी, तुळशी, कांदिवली, मंडपेश्वर या नावाची तिथे लहान गाव होती. अप्पा पाडा, दत्त पाडा. देवी पाडा हे आदिवासी पाडे होते, हेच माहीत नाही.

राष्ट्रीय उद्यानाच्या काही भागात फिरायला बंदी आहे. खरं तर तिथून भांडुप पंपिंग स्टेशनकडून पूर्व उपनगरात जाता येतं. एक रस्ता ठाण्याच्या येऊरकडे जातो; पण मध्ये हवाई दलाचं उपकेंद्र असल्याने तो मार्ग बंद असतो. एकीकडे आरे कॉलनी, जोगेश्वरीचा काही भाग, दुसरीकडे ठाणे व पूर्व उपनगरे आणि तिसरीकडे तुंगारेश्वर, वसईपर्यंतचा सर्व भाग या राष्ट्रीय उद्यान व अभयारण्याचा आहे. बोरांच्या झाडांमुळे बोरीवली नाव या भागाला पडलं. ब्रिटिश मात्र बेरेवली म्हणत या गावाला. बोरीवलीचा पेटारा असा आहे मोठा!

३६० अंशांत दिसू शकते मुंबई

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील अभयारण्याच्या भागात प्राणी तर आहेतच; पण दुर्मीळ वनस्पती व पक्षीही दिसतात. आत गिर्यारोहकांसाठी जांभूळमाळ नावाचा ट्रेक आहे. त्यासाठी फार चालावं लागत नाही. त्याच्या एका टप्प्यावरून तुळशी, विहार व पवई हे तीन मुंबईला पाणीपुरवठा करणारे तलाव एका रांगेत दिसतात. तुळशी आणि विहार हे दोन तलाव राष्ट्रीय उद्यानाच्या क्षेत्रात, तर पवई तलाव प्रत्यक्षात बाहेर आहे. हे मुंबईतील सर्वात उंच ठिकाण आहे. तिथून ३६० अंशांत मुंबई दिसू शकते.'

 

Web Title: Borivali is the highest point in Mumbai; Three lakes are visible, Mumbai can be seen in 360 degrees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई