Join us  

बोरिवली विधानसभा भाजपाचा बालेकिल्ला; विरोधकांसाठी लढाई वर्चस्वाची, आव्हान पेलण्याची

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2019 2:11 AM

सद्य:स्थितीमध्ये बोरीवली विधानसभेचे प्रतिनिधित्व भाजपचे आमदार विनोद तावडे हे करत आहेत. २०१४ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत प्रत्येक राजकीय पक्ष स्वतंत्ररीत्या लढला होता.

सचिन लुंगसेविधानसभा । बोरिवली

उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघाचे खासदार गोपाळ शेट्टी यांचे ‘होम पिच’ म्हणून बोरीवली विधानसभा मतदारसंघाची ओळख आहे. लोकसभा निवडणुकीत येथील बोरीवली, दहिसर, मागाठाणे, कांदिवली पूर्व, चारकोप आणि मालाड पश्चिम या सहा विधानसभा मतदारसंघांपैकी बोरीवली विधानसभा मतदारसंघातून शेट्टी यांना सर्वाधिक म्हणजे १ लाख ५२ हजार ६११ मते मिळाली आहेत. एका अर्थाने भाजपचा हा ‘बालेकिल्ला’च असून, येथे गोपाळ शेट्टी यांचे वर्चस्व आहे. येत्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे वर्चस्व मोडीत काढणे हेच विरोधकांसमोर आव्हान असणार आहे.

सद्य:स्थितीमध्ये बोरीवली विधानसभेचे प्रतिनिधित्व भाजपचे आमदार विनोद तावडे हे करत आहेत. २०१४ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत प्रत्येक राजकीय पक्ष स्वतंत्ररीत्या लढला होता. त्या वेळी भाजपचे उमेदवार विनोद तावडे यांना येथून १ लाख ८ हजार २७८ मते मिळाली होती. शिवसेनेचे उमेदवार उत्तमप्रकाश अग्रवाल यांना २९ हजार ११ मते मिळाली होती. मनसेचे उमेदवार नयन कदम यांना २१ हजार ७६५ मते मिळाली होती. काँग्रेसचे उमेदवार अशोक सुतराळे यांना १४ हजार ९९३ मते मिळाली होती.

राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार इंद्रपाल सिंग यांना १ हजार १९० मते मिळाली होती. तर नोटाला २ हजार ५६ मतदारांनी पसंती दिली होती. नोटाला दिलेली मते विचारात घेता राष्ट्रवादीच्या उमेदवारास याच्या निम्मी म्हणजे एक हजार मते मिळाली होती. मागच्या विधानसभेचा कल लक्षात घेता भाजपला या विधानसभेत सर्वाधिक मते मिळाली होती आणि भाजपचे विनोद तावडे येथून विजयी झाले होते. तत्पूर्वी २००९ च्या विधानसभा निवडणुकीकडे पाहिले असता भाजपचे उमेदवार गोपाळ शेट्टी येथे विजयी झाले होते. या वेळी त्यांना ६८ हजार ९२६ मते मिळाली होती. २००९ साली मनसेने पहिल्यांदा लोकसभेसाठी आपले उमेदवार उभे केले होते.

या मतदारसंघातून मनसेचे नयन कदम यांना ३६ हजार ६९९ मते मिळाली होती. मात्र हेच नयन कदम जेव्हा २०१४ च्या विधानसभेला उभे राहिले तेव्हा मात्र त्यांना २१ हजार ७६५ मते मिळाली. म्हणजे २००९ च्या तुलनेत २०१४ च्या विधानसभा निवडणुकीवेळी नयन कदम यांची मते घटली. २००९ साली मात्र मनसेच्या उमेदवारामुळे शिवसेनेच्या उमेदवाराची मते घटली होती. याचा फटका शिवसेनेला बसला होता आणि परिणामी प्रतिस्पर्धी उमेदवारांच्या मतांत वाढ झाली होती.

२००९ च्या विधानसभेला मोदी लाट नव्हती. २०१४ च्या विधानसभेला मोदी लाट होती. याचा फायदा महायुतीच्या म्हणजे भाजप आणि शिवसेनेच्या उमेदवारांना झाला होता. बोरीवली विधानसभेचा इतिहास पाहिला तर २००४ सालच्या विधानसभा निवडणुकीतही भाजपचे गोपाळ शेट्टी आमदार म्हणून विजयी झाले होते. २००४ साली गोपाळ शेट्टी यांना १ लाख ५२ हजार ७४८ मते होती. १९९९ सालच्या विधानसभेच्या निवडणुकीत भाजपच जिंकला होता. भाजपचे हेमेंद्र मेहता यांना १ लाख २७ हजार ७८४ मते होती. १९९५ सालीही भाजपचे हेमेंद्र मेहता विजयी झाले होते. तेव्हा त्यांना १ लाख ६३ हजार ६३९ मते होती. एकंदर बोरीवली विधानसभा क्षेत्र हा भाजपचा बालेकिल्ला आहे. भाजपचे येथे वर्चस्व आहे. परिणामी आगामी विधानसभा निवडणुकीतही येथे भाजपला फार काही कष्ट करावे लागणार नाहीत.

आगामी विधानसभा निवडणुकीस अवकाश असला तरीदेखील लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर आता विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. विधानसभा निवडणुकीची मोर्चेबांधणी सुरू झाली असून, विधानसभेला महायुती आणि महाआघाडी टिकणार की नाही, हा प्रश्न गुलदस्त्यात आहे. मात्र युती आणि आघाडी झाली नाही तर प्रत्येक राजकीय पक्षाची कसरत असणार आहे. तुलनेने भाजपला कमी कसरत करावी लागणार असली तरी विरोधी पक्षांना प्रचंड मेहनत करावी लागेल. 

टॅग्स :भाजपाशिवसेनामनसे