Join us

बाेअरवेलचे पाणी खारे ! मुंबईतील नऊपैकी जाेगेश्वरी, गाेरेगाव परिसरातील पाण्याचा दर्जा उत्तम 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2025 10:31 IST

प्रकल्पांतर्गत एकूण २६ ठिकाणी भूजल तपासणी करण्यात आली. मात्र, १९ ठिकाणांचा अहवाल प्राप्त झालेला नाही. त्या अहवालांनंतर मुंबईतील भूजलाची एकंदरीत स्थिती अधिक स्पष्टपणे समोर येईल.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबईतील भूजलाचा स्तर आणि त्यात वाढत्या खाऱ्या पाण्याच्या प्रमाणाचा अभ्यास करण्यासाठी केंद्र सरकारच्या जल मंत्रालयांतर्गत येणाऱ्या केंद्रीय भूमिगत जल सर्वेक्षण व विकास संस्था यांनी केलेल्या सर्वेक्षणाचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. त्यात शहरातील सात ठिकाणी नऊ बोअरवेलची ७० मीटर ते २०० मीटर खोलीपर्यंत तपासणी करण्यात आली. त्यात दोन ठिकाणे वगळता बहुतांश भागांतील पाणी खारे असल्याचे निष्पन्न झाले.

या प्रकल्पांतर्गत एकूण २६ ठिकाणी भूजल तपासणी करण्यात आली. मात्र, १९ ठिकाणांचा अहवाल प्राप्त झालेला नाही. त्या अहवालांनंतर मुंबईतील भूजलाची एकंदरीत स्थिती अधिक स्पष्टपणे समोर येईल. भूगर्भीय तपासणीमुळे संबंधित भागांतील विहिरी व बोअरवेलची स्थिती आणि भविष्यातील पाणी साठवणक्षमता याचे अचूक आकलन होईल.

दलदल भूमी, पाषाणभूमी सर्वेक्षणाचा अहवाल पालिकेला मिळाला असून, काही ठिकाणी दलदलीची जमीन, तर काही ठिकाणी अत्यंत ठोस पाषाणभूमी आढळली असल्याचे सांगण्यात आले. 

‘फिजिओमीटर’ बसविण्याची तयारी सुरू भूजलाच्या स्तरातील बदल आणि त्यातील मिठाच्या प्रमाणातील वाढ-घट रिअल टाइममध्ये समजावे, यासाठी पालिकेकडून या बोअरवेलमध्ये ‘फिजिओमीटर’ बसविण्याची तयारी सुरू आहे. या उपकरणाच्या मदतीने भूजलाच्या स्तरावर होणारे हंगामी व दीर्घकालीन बदल, तसेच पाण्याची गुणवत्ता याची सतत माहिती मिळणार आहे. यामुळे भविष्यातील पाणी व्यवस्थापन आणि पुनर्भरणाच्या योजना अधिक शास्त्रशुद्धपणे राबविता येतील, असे पालिका अधिकाऱ्यांनी सांगितले.

पावसाळा संपत आला, तरी रिचार्ज पिट्सचा पत्ता नाहीभूजल पुनर्भरणासाठी पालिकेने शहरातील बोअरवेल आणि विहिरीजवळ लहान रिचार्ज पिट्स तयार करण्याची योजना आखली होती. मात्र, पावसाळा संपत असतानाही हे पिट्स अद्याप तयार झालेले नाहीत. पालिका अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, आता पुढील मान्सूनपूर्व काळात ही कामे पूर्ण करण्यात येणार असून, पावसाळ्यातील पाणी या पिट्समधून जमिनीत झिरपवून बोरवेल रिचार्ज करण्याची प्रक्रिया सुरू होईल.

काेणत्या भागांतील पाणी पिण्यायाेग्य? जोगेश्वरीतील इस्माईल युसूफ कॉलेज परिसर आणि गोरेगाव फिल्मसिटी या भागांमध्ये तपासण्यात आलेले पाणी उत्तम दर्जाचे असल्याचे निष्कर्षात स्पष्ट झाले आहे. मात्र, इतर बहुतेक ठिकाणी खाऱ्या पाण्याचे प्रमाण चिंताजनकरीत्या अधिक असल्याचे सांगण्यात आले.

English
हिंदी सारांश
Web Title : Mumbai Borewell Water Salty; Jogeshwari, Goregaon Water Quality Good

Web Summary : Mumbai's borewell water is largely salty, except in Jogeshwari and Goregaon, a survey reveals. Authorities plan to install piezometers for real-time monitoring. Recharge pits are delayed, aiming for next monsoon. Further reports will clarify overall groundwater status.
टॅग्स :पाणी