उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2025 05:43 IST2025-09-20T05:39:34+5:302025-09-20T05:43:35+5:30
मराठवाड्यासह विदर्भ, कोकणात तब्बल ८०,९६२ कोटी रुपयांची गुंतवणूक

उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
मुंबई : एआयआयएफए (आयफा) तर्फे येथे आयोजित स्टील महाकुंभ कार्यक्रमात राज्य सरकारच्या उद्योग विभागाने ९ कंपन्यांशी ८० हजार ९६२ कोटी रूपयांचे सामंजस्य करार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नवकरणीय ऊर्जा मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या उपस्थितीत शुक्रवारी करण्यात आले. या करारामुळे राज्यात ४० हजारहून अधिक रोजगार निर्मिती होणार आहे.
गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर, वर्धा, रायगड, छत्रपती संभाजीनगर, सातारा आदी जिल्ह्यांत हे प्रकल्प उभारले जाणार आहेत. या गुंतवणुकीमुळे विदर्भ, मराठवाडा आणि कोकणातील औद्योगिक विकासाला गती मिळणार असून स्थानिकांना मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.
उद्योगांसाठीची वीज दरवर्षी स्वस्त होणार
महाराष्ट्रात २०३० पर्यंत ५८ टक्के वीज अक्षय ऊर्जेतून येणार आहे. २०२६ पर्यंत शेतकऱ्यांना दिली जाणारी १६ हजार मेगावॅट वीज सौरऊर्जेद्वारे मिळेल. त्यामुळे सबसिडी कमी होऊन उद्योगांसाठी वीजदर पुढील पाच वर्षे दरवर्षी कमी होईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
आयफा स्टीलेक्स २०२५ या स्टील महाकुंभाचे उद्घाटन फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी केंद्रीय नवीकरणीय ऊर्जामंत्री प्रल्हाद जोशी, उद्योगमंत्री उदय सामंत, उद्योग सचिव डॉ. पी. अन्बलगन, यूएनडीपी इंडिया प्रमुख डॉ. अँजेला लुसी, आयफाचे अध्यक्ष योगेश मंधाणी, मानद सरचिटणीस कमल अग्रवाल उपस्थित होते.