वांद्रे येथील ग्रंथालयातून एक लाख रुपयांची पुस्तके चोरीला ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2025 10:33 IST2025-10-06T10:33:46+5:302025-10-06T10:33:54+5:30
चौकशीनंतर पोलिस घेणार तक्रार; वसाहतीची जागा उच्च न्यायालयाला देणार

वांद्रे येथील ग्रंथालयातून एक लाख रुपयांची पुस्तके चोरीला ?
- मनोहर कुंभेजकर
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : वांद्रे पूर्वेकडील सरकारी वसाहतीची जागा मुंबई उच्च न्यायालयाच्या वापरासाठी देण्यात येणार आहे. त्यामुळे या वसाहतीच्या जागेतील ग्रंथालय आणि मुक्त वाचनालयावर हातोडा पडणार आहे. त्यामुळे हे ग्रंथालय बंद आहे. मात्र, या ग्रंथालयाच्या सुरक्षेची काळजी घेतली नसल्याने येथून सुमारे ८०० पुस्तके, रजिस्टर आणि वस्तू चोरीला गेली आहेत.
या पुस्तकांची किंमत एक लाख रुपये आहे. याप्रकरणी वांद्र्याच्या गव्हर्नमेंट क्वार्टर्स असोसिएशनने खेरवाडी पोलिस ठाण्यात तक्रार घेण्याची विनंती केली. मात्र, चौकशीअंती तक्रार दाखल करू, असे पोलिस म्हणाले. ग्रंथालयाला पर्यायी जागा द्यावी, यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह अपर मुख्य सचिव, सामान्य प्रशासन विभागाशी पत्रव्यवहार केला. मात्र, पर्यायी जागा दिली गेली नाही. त्यामुळे पर्यायी जागा मिळणार तरी कधी, असा सवाल करतानाच या ग्रंथालयाला आता कुणीही वाली उरलेला नाही, अशी खंत गव्हर्न्मेंट क्वार्टर्स असोसिएशनने व्यक्त केली.
या ग्रंथालयात कांदबरी, कथासंग्रह, चरित्र, विनोदी, नाटक, प्रवासवर्णन, कवितासंग्रह, संकीर्ण, संदर्भ ग्रंथ, रहस्य कथा अशी विविध विषयांवरील ११ हजार ५०० पुस्तके आहेत. तसेच अभ्यासिकेतील विद्यार्थ्यांना ‘एमपीएससी’ची विविध मोफत पुस्तके उपलब्ध करून दिल्याचे गव्हर्नमेंट क्वार्टर्स रेसिडेंट्स असोसिएशनचे अध्यक्ष जाधव यांनी सांगितले.
ग्रंथालय बंद असून, आजूबाजूला कोणीही राहत नाही. २९ सप्टेंबर रोजी मी ग्रंथालय पाहण्यासाठी गेले, तेव्हा मागील बाजूची ग्रील तोडल्याचे आढळले. चोरट्यांनी येथून आतमध्ये प्रवेश करून पुस्तके व इतर वस्तूंची चोरी केल्याचे निदर्शनास आले. खेरवाडी पोलिस ठाण्यात याबाबत असोसिएशनने लेखी तक्रार केली असून, तपास करण्याची मागणी केली आहे.
- रोहिणी जोशी, ग्रंथपाल
पर्यायी जागेची अद्याप प्रतीक्षाच
सरकारी वसाहतीमधील इतर अनधिकृत झोपडपट्टीवासीयांना, काही ग्राहक सोसायटी, पोस्ट ऑफिस यांना वसाहतीमध्ये पर्यायी जागा देण्यात आली. मात्र, ग्रंथालयास पर्यायी जागा दिलेली नाही, याकडे असोसिएशनने लक्ष वेधले आहे.