Join us

कुणाल कामराला बुक माय शोचा मोठा झटका; कलाकारांच्या यादीतून नाव हटवलं, कॉन्टेन्टही काढला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2025 15:06 IST

स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराला बुक माय शोने मोठा धक्का दिला आहे.

Kunal Kamra Row: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर वादग्रस्त गाण तयार केल्याबद्दल स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराच्या अडचणी थांबण्याचे नाव घेत नाहीये. एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केल्यानंतर कुणाल कामरावर गुन्हा दाखल झाला असून मुंबई पोलीस त्याची चौकशी करणार आहेत. मात्र पोलिसांच्या समन्सनंतरही कामरा चौकशीसाठी हजर झालेला नाही. दुसरीकडे कुणाल कामराला ऑनलाईन तिकीट बुकिंग प्लॅटफॉर्म बुक माय शो ने मोठा धक्का दिला आहे. त्याआधी शिवसेनेच्या युवासेनेचे महासचिव राहुल कनाल यांनी कुणाल कामरासंदर्भात पत्र लिहीलं होतं.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता केलेल्या टिप्पणीमुळे कॉमेडियन कुणाल कामरा यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. तीन समन्स आणि एफआयआरनंतर आता बुक माय शो या ऑनलाइन प्लॅटफॉर्मने त्याच्याशी संबंधित सर्व कंटेट काढून टाकला आहे. कॉमेडियन कुणाल कामराचा कंटेट बुक माय शोच्या अधिकृत साइटवरून काढून टाकल्याने त्याला मोठा फटका बसला आहे. बुक माय शोने कलाकारांच्या यादीतूनही त्याचे नाव देखील काढून टाकले आहे.

शिवसेना नेते राहुल कनाल यांनी बुक माय शोला पत्र लिहून कुणाल कामराला त्याच्या भविष्यातील शोसाठी तिकीट प्लॅटफॉर्म देऊ नये अशी विनंती केली होती. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली. आता राहुल कनाल यांनी यासाठी बुक माय शोच्या सीईओंचे आभार मानले आहेत. "तुमच्या टीमने केलेल्या कारवाईबद्दल मी कृतज्ञ आहे. कुणाल कामराला विक्री आणि जाहिरात सूचीमधून आणि बुक माय शोच्या सर्च हिस्ट्रीमधून  काढून टाकल्याबद्दल धन्यवाद. शांतता राखण्यासाठी आणि आमच्या भावनांचा आदर करण्यासाठी तुमचा विश्वास महत्त्वाचा आहे. मुंबईकरांना सर्व प्रकारच्या कलेवर प्रेम आणि विश्वास आहे," परंतु वैयक्तिक कार्यक्रमांवर नाही, असं राहुल कनाल यांनी म्हटलं.

राहुल कनाल यांनी लिहीले होते पत्र

"कामराला परफॉर्म करण्यासाठी एक प्लॅटफॉर्म देऊन बुक माय शो अनवधानाने अशा व्यक्तीला संधी देत आहे ज्यांच्या कृतींमुळे सार्वजनिक सुव्यवस्था धोक्यात येते. बिग ट्री एंटरटेनमेंट आणि बुक माय शोने यापुढे तुमच्या प्लॅटफॉर्मवर कुणाल कामराचे शो प्रकाशित करणे किंवा त्याचा प्रचार करणे टाळावे अशी माझी मनापासून विनंती आहे. त्याच्या कार्यक्रमांसाठी तिकीट विक्रीची सुविधा चालू ठेवणे हे त्यांच्या फुटीरतावादी वक्तृत्वाचे समर्थन मानले जाऊ शकते, ज्यामुळे शहरातील सार्वजनिक भावना आणि सुव्यवस्थेवर गंभीर परिणाम होऊ शकतो, असं राहुल कनाल यांनी म्हटलं. 

टॅग्स :कुणाल कामरामुंबईएकनाथ शिंदे