सायन रुग्णालयात ‘बोन मॅरो ट्रान्सप्लांट’च गरीब रुग्णांना दिलासा : खर्च सीएसआर निधीतून
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2025 08:41 IST2025-02-23T08:41:42+5:302025-02-23T08:41:49+5:30
केंद्र सायन रुग्णालयाच्या धारावी येथील उपकेंद्रात (छोटा सायन) सुरू केले जाणार आहे.

सायन रुग्णालयात ‘बोन मॅरो ट्रान्सप्लांट’च गरीब रुग्णांना दिलासा : खर्च सीएसआर निधीतून
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : महापालिकेच्या सायन रुग्णालयात लाखो रुपये खर्च येणारी ‘बोन मॅरो ट्रान्सप्लांट’ प्रक्रिया मोफत करण्यात येणार आहे. कॉर्पोरेट कंपन्यांच्या सामाजिक दायित्व निधीमधून (सीएसआर) हा खर्च करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, १४ वर्षांखालील मुलांना हे उपचार दहा वर्षापर्यंत मोफत दिले जातील. यामुळे दुर्मीळ आजार झालेल्या गरीब रुग्णांना हे उपचार घेणे सोपे होणार आहे. ‘बोन मॅरो ट्रान्सप्लांट’ केंद्राच्या पायाभूत सुविधा आणि अत्याधुनिक यंत्रसामग्रीसाठी १८ कोटी खर्च करण्यात येणार आहे. हे केंद्र सायन रुग्णालयाच्या धारावी येथील उपकेंद्रात (छोटा सायन) सुरू केले जाणार आहे.
यासंदर्भात, सायन रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी यांना विचारले असता त्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला. त्यांनी सांगितले, याबाबतची सर्व प्रक्रिया लवकरच पार पडणार आहे. त्यांनतर ही सुविधा गरीब रुग्णांसाठी उपलब्ध होईल.
लाखो रुपयांची उपचार प्रक्रिया मोफत...
अनेक खासगी रुग्णालयांत या उपचारांसाठी १० ते १५ लाख रुपयांचा खर्च येतो. त्यामुळे गरीब रुग्णांना हे उपचार घेता येत नाहीत. गेल्या काही वर्षांत काही शासकीय योजनांमधून या आजारांसाठी आर्थिक मदत दिली जाते. तरीही मोठा खर्च रुग्णांच्या नातेवाइकांनाच करावा लागतो. या आजारांवर उपचार न केल्यास त्या रुग्णाला आयुष्यभर त्या आजारासह जगावे लागते. सायन रुग्णालयात ही शस्त्रक्रिया मोफत करण्यात येणार आहे.
हे उपचार कोणासाठी?
ल्युकेमिया (रक्ताचा कर्करोग), सिकलसेल, थॅलेसेमिया, तसेच मुलांसह प्रौढांमधील अप्लास्टिक अनेमिया, आनुवंशिकतेमुळे होणाऱ्या मेंदूच्या विकारांसह ५० पेक्षा अधिक प्रकारच्या दुर्धर आजाराने त्रस्त रुग्णांमध्ये बोन मॅरो ट्रान्सप्लांट (बीएमटी) केले जाते. बीएमटी केल्यानंतर ७० ते ७५ टक्के रुग्ण आजारमुक्त होत असल्याचे सिद्ध झाले आहे. यासाठी भाऊ-बहीण, आई-वडील हे आपल्या रुग्णाला बोन मॅरो देऊ शकतात.
महापालिकेशी करार
औषध निर्मितीतील आघाडीच्या सिप्ला कंपनीच्या सिप्ला फाउंडेशन आणि एम. के. हमीद फाउंडेशनच्या सहाय्याने गरीब मुलांना हे उपचार मोफत देण्यात येणार आहेत. यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाशी १० वर्षांचा करार करण्यात येणार आहे.