बॉम्बे डाईंग व श्रीनिवास मिलमधील गिरणी कामगारांना मिळाली घरे
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2024 18:25 IST2024-02-22T18:25:25+5:302024-02-22T18:25:31+5:30
१४२ यशस्वी पात्र गिरणी कामगार, वारसांना सदनिकांच्या चाव्यांचे वाटप

बॉम्बे डाईंग व श्रीनिवास मिलमधील गिरणी कामगारांना मिळाली घरे
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : म्हाडातर्फे २०२० मध्ये बॉम्बे डाईंग मिल व श्रीनिवास मिलमधील गिरणी कामगारांसाठी सोडत काढण्यात आली होती. यातील १४२ यशस्वी पात्र गिरणी कामगार / वारस यांना बाराव्या टप्प्यांतर्गत सदनिकांच्या चाव्यांचे वाटप गिरणी कामगार घर संनियंत्रण समितीचे अध्यक्ष व आमदार सुनील राणे, आमदार कालिदास कोळंबकर यांच्या हस्ते करण्यात आले. वांद्रे पूर्व येथील म्हाडा मुख्यालयात म्हाडा व गिरणी कामगार घर संनियंत्रण समिती यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी एमएमआरडीएच्या अखत्यारीतील रांजनोळी येथील गृहप्रकल्पातील सदनिकांची सोडत गिरणी कामगार व त्यांच्या वारसांकरिता जाहीर करण्यासाठी गिरणी कामगार घर संनियंत्रण समिती आग्रही आणि प्रयत्नशील आहे, अशी माहिती सुनील राणे यांनी यावेळी दिली.
दरम्यान, १,५०,४८४ गिरणी कामगार व त्यांच्या वारसांची पात्रता निश्चिती करण्याकरिता अभियान सुरू आहे. अभियानाला १५ मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. आठ महिन्यांपासून सुरू असलेल्या अभियानात एकूण १,०६,८५१ अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यापैकी ८७,६९५ अर्जदार पात्र ठरले असून उर्वरित अर्जांची छाननी करून पात्र / अपात्र निश्चितीची कार्यवाही सुरू आहे.