मराठा आरक्षणासाठी २७ ऑक्टोबरला मुंबई बाजार समिती बंद; माथाडी कामगार आक्रमक
By नामदेव मोरे | Updated: October 26, 2023 19:44 IST2023-10-26T19:44:26+5:302023-10-26T19:44:44+5:30
मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनाला माथाडी कामगारांनी पाठिंबा दिला आहे.

मराठा आरक्षणासाठी २७ ऑक्टोबरला मुंबई बाजार समिती बंद; माथाडी कामगार आक्रमक
नवी मुंबई : मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनाला माथाडी कामगारांनी पाठिंबा दिला आहे. शुक्रवार २७ ऑक्टोबरला एक दिवसाच्या लाक्षणीक बंदचे आवाहन केले असून मुंबई बाजार समितीमधील पाचही मार्केटमधील व्यवहार बंद ठेवले जाणार आहेत. आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर लढा सुरू आहे. प्रत्येक गावामधील नागरिक आंदोलनामध्ये सहभागी होत आहेत. महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनीयनमधील माथाडी कामगारांनीही या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. शुक्रवारी एक दिवसाच्या बंदचे आयोजन केले आहे. सकाळी दहा वाजता कामगार माथाडी भवन येथे एकत्र होणार असून आंदोलनाला पाठिंबा देणार आहेत. कामगारांनी एक दिवसाचे लाक्षणीक आंदोलन केल्यामुळे बाजार समितीमधील कांदा बटाटा, मसाला, धान्य, फळ मार्केटमधील व्यवहार बंद राहणार आहेत.
मराठा आरक्षणाच्या लढ्यामध्ये माथाडी संघटनेचे मोठे योगदान आहे. २२ मार्च १९८२ मध्ये संघटनेचे संस्थापक अण्णासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली विधान भवनावर मोर्चा काढला होता. सरकारने आरक्षण न दिल्यामुळे २३ मार्चला अण्णासाहेबांनी आरक्षणासाठी हौताम्य पत्करले होते. तेव्हापासून आरक्षणासाठी कामगार पाठपुरावा करत असून राज्यात सुरू असलेल्या आंदोलनामध्येही सहभागी होण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.