मुंबई विमानतळ आणि ताज हॉटेलला बॉम्बनं उडवण्याची धमकी; एअरपोर्ट पोलिसांना आला ईमेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2025 11:31 IST2025-05-17T11:30:42+5:302025-05-17T11:31:28+5:30

हा धमकीचा ईमेल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एअरपोर्ट पोलीस अधिकाऱ्यांना अधिकृत मेलवर पाठवला.

Bomb threat to Mumbai airport and Taj Hotel; Airport Police receives email | मुंबई विमानतळ आणि ताज हॉटेलला बॉम्बनं उडवण्याची धमकी; एअरपोर्ट पोलिसांना आला ईमेल

मुंबई विमानतळ आणि ताज हॉटेलला बॉम्बनं उडवण्याची धमकी; एअरपोर्ट पोलिसांना आला ईमेल

मुंबई - मुंबई छत्रपती शिवाजी महाराज विमानतळ आणि ताज महल हॉटेलला बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाली आहे. मुंबई एअरपोर्ट पोलिसांना हा धमकीचा ईमेल आला आहे. त्यात ताज महल हॉटेल आणि मुंबई विमानतळ बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली आहे. दहशतवादी अफजल गुरू आणि सैवक्कू शंकर याच्या फाशीचा बदला घेणारच असं या ईमेलमध्ये म्हटलं आहे. या ईमेलची मुंबईत पोलिसांनी तात्काळ दखल घेत तपासाला सुरुवात केली आहे. या दोन्ही ठिकाणी सुरक्षा व्यवस्था वाढवली असून अद्याप काही संशयास्पद सापडले नाही.

हा धमकीचा ईमेल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एअरपोर्ट पोलीस अधिकाऱ्यांना अधिकृत मेलवर पाठवला. शिपाई महेश कदम हे त्यावेळी ड्युटीवर होते. या ईमेलमध्ये ७ आरडीएक्स बॉम्ब ताज महल हॉटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज एअरपोर्ट परिसरात ठेवण्यात आल्याचा दावा केला होता. धमकीचा मेल प्राप्त झाल्यानंतर पोलीस शिपाई कदम यांनी तातडीने वरिष्ठ अधिकारी व्हटकर यांना माहिती कळवली. त्यानंतर बॉम्बनिरोधी पथकाने एअरपोर्ट टर्मिनल १, २, प्रवेश गेट, टॅक्सी स्टँडसह हॉटेल ताज सांताक्रुझ आणि एटीसी टॉवरची तपासणी केली. 

राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणेने आज सकाळी मुंबई एअरपोर्टवर २ फरार दहशतवाद्यांना पकडले. हे दोघेही दहशतवादी पुण्यात ISIS चे स्लीपर होते. अब्दुल्ला फैयाज शेख आणि तल्हा खान असं पकडलेल्या आरोपींची नावे आहेत. गुप्तचर यंत्रणेला मिळालेल्या माहितीनंतर या दोघांना एअरपोर्टच्या टर्मिनल २ वरून सापळा रचत पकडले. या दोघांच्या सामानाची तपासणी करून ते जप्त करण्यात आले. हे दोघेही इंडोनेशियातून जकार्ता तिथून भारतात उतरले होते. सुरक्षा यंत्रणेला चकवा देत ते एअरपोर्टवरून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होते. हे दोघेही २ वर्षापासून फरार होता. त्यांच्यावर ३ लाखांचे बक्षिस जाहीर केले होते. 

दरम्यान, २२ एप्रिल रोजी काश्मीरमधील पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला. या दहशतवादी हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला. या  हल्ल्यानंतर देशभरात दहशतवादाविरुद्ध संताप व्यक्त करण्यात आला. या हल्ल्यानंतर भारताने दहशतवाद्यांवर कठोर कारवाई केली आणि पाकिस्तानमधील दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले. याशिवाय काश्मीरमध्ये दहशतवाद्यांवर मोठ्या प्रमाणात कारवाई केली जात आहे, त्यांचा खात्मा केला जात आहे. यातूनच धमकीचे ईमेल प्राप्त होत असल्याचे दिसून येते. 

Web Title: Bomb threat to Mumbai airport and Taj Hotel; Airport Police receives email

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.