लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबईत बॉम्ब कॉलच्या अफवांचे सत्र सुरूच असून, बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजच्या फिरोज टॉवर इमारतीत चार बॉम्ब ठेवल्याच्या अफवेने त्यात भर घातली. चौकशीअंती ती अफवा असल्याचे स्पष्ट होताच खोटी माहिती पसरवणाऱ्या अनोळखी व्यक्तीविरोधात माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी गुन्हे शाखेकडूनही तपास सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी केरळचे मुख्यमंत्री कॉ. पिनारी विजयन यांच्या नावे धमकीचा ई-मेल स्टॉक एक्सचेंजला आला होता. रविवारी सुट्टी असल्याने सोमवारी स्टॉक एक्स्चेंजच्या कर्मचाऱ्यानी ई-मेल बघताच पोलिसांना माहिती दिली. ई-मेलमध्ये आरडीएक्स वापरून तयार करण्यात आलेले चार बॉम्ब फिरोज टॉवर इमारतीत ठेवण्यात आले असून, दुपारी ठीक तीन वाजता त्यांचा स्फोट होईल, असे नमूद करण्यात आले होते.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी बॉम्बशोधक व नाशकपथक आणि श्वानपथकांच्या साहाय्याने स्टॉक एक्स्चेंजमध्ये तपासणी केली; मात्र कुठलीही संशयास्पद वस्तू न आढळल्याने ती अफवा असल्याचे जाहीर करण्यात आले. त्यानंतर एमआरए मार्ग पोलिसांनी ई-मेल पाठवणाऱ्या अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा नोंदवला. ई-मेल पाठवण्यासाठी वापरलेल्या आयपी ॲड्रेसची माहिती मिळविण्याचा प्रयत्न गुन्हे शाखेकडून सुरू आहे.