body of a senior citizen found after he locked himself in room from a week | कोरोनाच्या धास्तीनं आजोबांनी स्वत:ला घरातच कोंडलं; सात दिवसांनी धक्कादायक प्रकार समोर

कोरोनाच्या धास्तीनं आजोबांनी स्वत:ला घरातच कोंडलं; सात दिवसांनी धक्कादायक प्रकार समोर

मुंबई : कोरोनाच्या धास्तीने घरातच कैद करून घेतलेल्या ६५ वर्षीय मुख्तार अन्सारी या आजोबांचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह पोलिसांच्या हाती लागल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी विक्रोळी पोलीस अधिक तपास करत आहेत. विक्रोळी कन्नमवार नगर २ येथे अन्सारी हे १९९० पासून एकटेच राहण्यास होते. त्यांची बहीण कुवेतला राहते. अन्सारी रिक्षा चालवून उदरनिर्वाह करायचे. लॉकडाऊनमुळे गेले दोन ते तीन महिने ते घरीच होते. स्वत:च जेवण बनवून घरातच राहायचे. दरम्यान, बरेच दिवस अन्सारी चाचा दिसले नाहीत, त्यातच त्यांच्या घरातून दुर्गंधी वाढल्याने शेजारच्यांनी ७ आॅगस्ट रोजी पोलिसांना माहिती दिली. विक्रोळी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत, दरवाजा तोडला असता कुजलेल्या अवस्थेतील त्यांचा मृतदेह आढळला. तो शवविच्छेदनासाठी राजावाडी रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.

मृतदेहाच्या अवस्थेवरून त्यांचा ७ ते ८ दिवसांपूर्वीच मृत्यू झाल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. त्यांच्या भाच्याने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, अन्सारी यांचा तलाक झाल्यानंतर १९९० पासून ते एकटेच राहत होते. ते जास्त कुणाला भेटत नसत. त्यातच लॉकडाऊनमध्ये त्यांनी घराबाहेर पडणे बंद केले होते. त्यात मानसिकरीत्याही ते स्थिर नव्हते. सध्या तरी संशयास्पद काहीही आढळून आलेले नसून शवविच्छेदनाच्या अहवालातून मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल, असे पोलिसांनी सांगितले.

 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: body of a senior citizen found after he locked himself in room from a week

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.