Mumbai Crime: पुण्याच्या दौंडमध्ये कचऱ्यात काचेच्या बरण्यांमध्ये शरिराचे अवयव सापडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. त्यानंतर मुंबईतूनही त्याच दिवशी अशाच प्रकारची घटना समोर आली आहे. मुंबईविमानतळावर स्वच्छतागृहामध्ये नवजात बाळाचा मृतदेह आढळून आला. या घटनेनं विमानतळावर खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या प्रकरणाची नोंद करुन तपास सुरु केला आहे. बाळाला टॉयलेटमध्ये कोणी सोडलं याचा कसून तपास करण्यात येत आहे.
मंगळवारी रात्री स्वच्छतागृहात कचऱ्याच्या डब्यामध्ये नवजात अर्भकाचा मृतदेह आढळल्याची बातमी येताच मुंबई विमानतळावर एकच खळबळ उडाली. रात्री साडेदहाच्या सुमारास विमानतळाच्या स्वच्छतागृहात नवजात अर्भकाचा मृतदेह सापडल्यानंतर कर्मचाऱ्यांनी विमानतळ सुरक्षा कर्मचाऱ्यांसह जवळच्या पोलीस ठाण्याला माहिती देण्यात आली. माहिती मिळताच स्थानिक पोलीस अधिकारी तिथे पोहोचले आणि त्यांनी अर्भकाला रुग्णालयात नेलं. मात्र डॉक्टरांनी तपासून नवजात मृतकाला मृत घोषित केले.
सहार पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे. पोलिसांकडून अर्भक तिथे कोणी टाकले याचा शोध घेण्यात येत आहे. पोलिसांकडून विमानतळावर लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासण्यात येत आहे. याशिवाय त्यावेळी कामावर असलेल्या कर्मचाऱ्यांचीही चौकशी करण्यात येत आहे.
दरम्यान, पुण्यात दौंड परिसरात बोरावके नगरच्या जवळ असलेल्या एका हॉटेलच्या मागे कचराकुंडीजवळ अर्भक आणि शरीराचे अवशेष असलेल्या बरण्या सापडल्या होत्या. बॉक्समध्ये काही बरण्या होत्या. त्यातील एका बरणीत मृत अवस्थेत असलेले अर्भक सापडल्याने पोलिसांना या प्रकरणाची माहिती देण्यात आली. अवयवांची तपासणी केल्यानंतर पुरुष जातीचे अर्भक असल्याचे चौकशीतून समोर आलं.