Join us
Daily Top 2Weekly Top 5

मढवरून वेसाव्याला जाणारी बोट पलटली, ३ जण बेपत्ता तर चौघेजण वाचले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2020 22:08 IST

केंद्र  व महाराष्ट्र शाशनाच्या वतीने मासेमारी करण्यासाठी परवानगी जरी दिली असली तरी प्रशाशन व त्यांच्या मार्फत मच्छिमार व मच्छिमार व्यवसायाशी संबंधित लोकांसाठी सुविधा उपलब्ध नाही

मनोहर कुंभेजकर 

मुंबई--मढ वरून काल रात्री 8 च्या सुमारास सुकी मासळी घेऊन वेसाव्याला जात असतांना  शिपील(छोटी होडी) उलटली.या दुर्घटनेत 3 व्यापारी बेपत्ता असून तर 4 जण वाचले आहेत.फायर ब्रिगेड व कोस्ट गार्ड या 3 बेपत्ता नागरिकांचा शोध घेत आहे. मालवणी पोलिसांनी काल वर्सोवा एव्हरेस्ट अपार्टमेंट येथील अमीन हनिफ इस्माईल मच्छिवाला(28) यांनी मध्यरात्री नोंदविलेल्या एफआयआर नुसार येथील सय्यद नझीर( 55),सादिक कासमानी(45) व युसुफ चौहान(48) अशी या तीन बेपत्ता व्यापाऱ्यांची नावे आहेत.

दरम्यान या घटनेची माहिती मिळताच प्रभाग क्रमांक 59 च्या स्थानिक शिवसेना नगरसेविका प्रतिमा खोपडे व शाखाप्रमुख सतीश परब यांनी या तीन बेपत्ता कुटुंबाच्या सदस्यांची भेट घेतली व शिवसेनेतर्फे सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. तर वर्सोवा विधानसभा मतदार संघाच्या स्थानिक भाजपा आमदार डॉ.भारती लव्हेकर यांनी मत्स्यव्यवसाय मंत्री अस्लम शेख यांच्याशी संपर्क साधून माझ्या मतदार संघातील या तीन बेपत्ता नागरिकांचा लवकर शोध घ्यावा अशी मागणी केली.आज दिवसभर शोध मोहिम सुरू होती,दरम्यान उद्या पुन्हा शोध मोहिम घेण्यात येईल असे आश्वासन मंत्रीमहोदयांनी दिल्याचे आमदार लव्हेकर यांनी लोकमतला सांगितले.

केंद्र  व महाराष्ट्र शाशनाच्या वतीने मासेमारी करण्यासाठी परवानगी जरी दिली असली तरी प्रशाशन व त्यांच्या मार्फत मच्छिमार व मच्छिमार व्यवसायाशी संबंधित लोकांसाठी सुविधा उपलब्ध नाही. झाल्याने मासळी खरेदी करणारे वेसावे खोजा गल्लीतील तीन सुकी मासळी व्यापारी बेपत्ता असून चार जण सुमुद्र किनारी पोहत आल्याने वाचले आहेत अशी माहिती मढ दर्यादीप मच्छिमार सहकारी संस्थाचे अध्यक्ष संतोष कोळी यांनी लोकमतला दिली.

राज्याचे मत्स्यव्यवसाय मंत्री  अस्लम शेख यांनी याप्रकरणी जातीने  लक्ष घालून या तीन बेपत्ता मासळी विक्रेत्यांचा लवकर शोध घेण्यासाठी शासना मार्फत योग्य ते सहकार्य करावे अशी मागणी संतोष कोळी यांनी केली आहे.

मढ विभागात मासेमारांनी आपल्या संपूर्ण नौका बंद करण्याचा निर्णय घेतला असून त्या नौकावरील खलाशी नौकेतून उतरून गावात गर्दी करू नये म्हणून त्यांची त्यांचा गावी जाण्याची शाशनाने सोय करावी अशी मागणी केली आहे.परंतू त्यावर अजून पर्यंत  निर्णय न झाल्याने मच्छिमारानी  आपला नौका तोटा सहन करून चालू ठेवाव्या लागत आहेत. सुकी मासळी खरेदी करण्यासाठी वर्सोवा वरून आलेल्या लोकांना जाण्या येण्यासाठी मढ वर्सोवा फेरी बोटीने प्रवास करण्यास फेरी बोट वाल्यांनी मनाई केल्याने व तसे शाशनाने फेरी बोटीला निर्देश न दिल्याने त्या लोकाना खरेदी केलेली मासळी मढ येथून वर्सोवा येथे प्रवास करण्यासाठी नाईलाजस्तव छोट्या नौकेने प्रवास करावा लागला आणि त्या प्रवासा दरम्यान सदर नौका बुडून ३ विक्रेते बेपत्ता झाले आहेत अशी माहिती त्यांनी दिली.

अजून बुडालेल्या या तीन लोकांचा शोध लावता आला नाही. मच्छिमार व मासळी खरेदी करणारे व्यापारी त्यांचा काल रात्रीपासून शोध घेण्याचा प्रयत्न करीत आहोत परंतु फायर ब्रिगेड व इतर प्रशासकीय यंत्रणेमार्फत शोध मोहीम करण्यास सहकार्य होत नाही म्हणून मच्छिमार व व्यापारी यांच्यामधे नाराजी व्यक्त होत असल्याची माहिती संतोष कोळी यांनी दिली

टॅग्स :अपघात