रिक्षा, टॅक्सी चालकांसाठीचे मंडळ राहिले कागदावरच
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2025 09:27 IST2025-01-14T09:27:31+5:302025-01-14T09:27:44+5:30
प्रतिनियुक्तीवर चार अधिकाऱ्यांकडे अधिभारही देण्यात आला; मात्र मंडळाला अद्याप कार्यालयच नसल्याने प्रत्यक्षात कामकाजाला सुरुवात झालेली नाही.

रिक्षा, टॅक्सी चालकांसाठीचे मंडळ राहिले कागदावरच
- सुरेश ठमके
मुंबई : राज्य सरकारने दहा महिन्यांपूर्वी रिक्षा आणि मीटर टॅक्सीधारकांसाठी कल्याणकारी मंडळाची स्थापना करत त्यासाठी ५० कोटींचा निधी मंडळाच्या खात्यावर जमा केला. प्रतिनियुक्तीवर चार अधिकाऱ्यांकडे अधिभारही देण्यात आला; मात्र मंडळाला अद्याप कार्यालयच नसल्याने प्रत्यक्षात कामकाजाला सुरुवात झालेली नाही.
कल्याणकारी मंडळाचे कार्यालय चर्चगेट स्टेशननजीकच्या औद्योगिक विमा इमारतीत प्रस्तावित आहे; परंतु ते अद्याप तयार झालेले नाही. राज्यस्तरीय कार्यालयात १४ कर्मचारी घेण्याचा निर्णय घेण्यात आला तर जिल्हास्तरीय कार्यालयासाठी १३२ कर्मचारी नेमले जाणार आहेत.
नोंदणी शुल्काला विरोध : राव
मंडळासंदर्भात मुंबई रिक्षा टॅक्सी मेन युनियनचे नेते शशांक राव म्हणाले की, राज्यात १५ लाख रिक्षा चालक आणि ८० हजार मीटर रिक्षा चालक आहेत. या सर्वांकडून ८०० रुपये नोंदणी शुल्क घेत असाल तर ती रक्कम १२० कोटींपेक्षा अधिक होते. राज्य सरकार केवळ ५० कोटी देणार आणि १२० कोटी रिक्षा टॅक्सी चालकांकडूनच वसूल करणार हे योग्य नाही. बांधकाम मजुरांची जशी नाममात्र शुल्क आकारून नोंदणी करण्यात आली त्याप्रकारे रिक्षा टॅक्सी चालकांचीही नोंदणी करावी.
समितीच गठित नाही
यासंदर्भात राज्यस्तरीय आणि जिल्हास्तरीय समित्या गठित करण्याचा निर्णय घेण्यात आला; मात्र अशासकीय सदस्यांच्या नियुक्तीसाठी जिल्हा आणि राज्यस्तरावर केवळ पत्रे पाठवण्यात आली आहेत अद्याप कोणाचीही नियुक्ती करण्यात आलेली नाही.
या आहेत मागण्या
रिक्षा चालकांना वयाच्या
६५ वर्षांनंतर किमान
६ ते ८ हजार रुपये पेन्शन मिळावी.
रिक्षा चालक मृत्यू पावल्यास त्याच्या कुटुंबाला दहा लाख रुपयांचा विमा किंवा नुकसानभरपाई मिळावी.
मुलांच्या शिक्षणासाठी दहा लाख रुपयांपर्यंत बिनव्याजी कर्ज देण्यात यावे. पाच लाख रुपयांपर्यंतची विमा योजना असावी.
चार वरिष्ठ अधिकारी सध्या प्रतिनियुक्तीवर कार्यरत आहेत. परवानाधारक ऑटो रिक्षा आणि मीटर टॅक्सी चालकांना नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले; परंतु प्रत्यक्षात काय काम करायचे, याची परिवहन कार्यालयातील कर्मचाऱ्यांना स्पष्टता नाही. त्यामुळे नोंदणी धीम्या गतीने सुरू आहे. माहितीचे संकलन अद्याप झालेले नाही.
- नीलेश सानप,
कार्यालयीन अधीक्षक, रिक्षा, टॅक्सी कल्याणकारी मंडळ