मुंबई - गेल्यावर्षी वरळी येथे एका महिलेचा जीव घेणाऱ्या बीएमडब्ल्यू हिट अँड रन प्रकरणातील आरोपी व शिंदेसेनेचे नेते राजेश शहा यांचा मुलगा मिहिर शहा याचा जामीन अर्ज शुक्रवारी सत्र न्यायालयाने फेटाळला.
७ जुलै २०२४ रोजी मिहिरने वरळी सी-लिंकवरून बीएमडब्ल्यू भरधाव वेगाने चालवीत एका स्कूटरला धडक दिली. यामध्ये स्कूटरवर बसलेली महिला खाली पडली. त्यानंतर ती मिहिरच्या गाडीत अडकली. तरीही मिहिरने तिला तसेच फरफटत नेले. सुमारे दोन किलोमीटर अंतर तिला फरफटत नेल्याने तिचा मृत्यू झाला, तर महिलेचा पती जखमी झाला.मिहिर दारूच्या नशेत गाडी चालवीत होता, असे पोलिसांनी सांगितले. ९ जुलै २०२४ रोजी मिहिरला पोलिसांनी अटक केली. त्याला मिहिरने न्यायालयात आव्हान दिले. पोलिसांनी कारण न देताच अटक केल्याचा दावा मिहिरने केला.
मुंबई उच्च न्यायालयाने याआधी त्याचा जामीन अर्ज फेटाळला होता. मिहिर व सहआरोपीला त्यांनी केलेल्या भयानक कृत्याच्या परिणामाची जाणीव होती, असे न्यायालयाने म्हटले होते. या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले. तेथे अजूनही हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे.
एक वर्ष कोठडीत काढले...ऑक्टोबर २०२४ मध्ये पोलिसांनी याप्रकरणी मिहिर व सहआरोपीवर आरोपपत्र दाखल केले. त्यामुळे पुन्हा एकदा मिहिरने गुणवत्तेच्या आधारावर सत्र न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला.
मिहिरने एक वर्ष कोठडीत काढले आहे. त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही आणि तो मुंबईचा कायमस्वरूपी रहिवासी आहे. खटला अद्याप सुरू झाला नाही आणि ५४ साक्षीदारांची साक्ष नोंदवायची आहे. या प्रक्रियेत खूप वेळ लागेल, असा युक्तिवाद मिहिरच्या वकिलांनी न्यायालयात केला. सरकारी वकिलांनी जामीन अर्जाला विरोध केला. न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून मिहिर शहाची जामिनावर सुटका करण्यास नकार दिला.