BMC च्या मुदत ठेवींत ८ महिन्यांत २ हजार कोटींनी घट; मागील ३ वर्षात १२ हजार कोटींची घसरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2025 12:19 IST2025-09-23T12:19:28+5:302025-09-23T12:19:50+5:30
माहिती अधिकारात उघड; विकास कामांवर जास्त खर्च, सामाजिक कार्यकर्ते गॉडफ्रे पिमेंटा यांनी माहिती अधिकारात पालिकेकडे गेल्या काही वर्षांतील मुदत ठेवींचा तपशील मागितला होता.

BMC च्या मुदत ठेवींत ८ महिन्यांत २ हजार कोटींनी घट; मागील ३ वर्षात १२ हजार कोटींची घसरण
मुंबई - देशातील श्रीमंत महापालिका, अशी बरुदावली मिरवणाऱ्या मुंबई महापालिकेच्या मुदत ठेवींमध्ये मागील काही वर्षांपासून सातत्याने घट होत आहे. २०२१-२२ मध्ये ९१ हजार ६९०.८४ कोटी रुपयांच्या मुदत ठेवी होत्या. आता त्यात १२ हजार १९२ कोटींची घट झाल्याने त्या ७९ हजार ४९८.५९ कोटी रुपयांपर्यंत घटल्या आहेत. यंदाचा अर्थसंकल्प जाहीर झाला तेव्हा या ठेवी ८१ हजार कोटींवर होत्या, मात्र आता मागील आठ महिन्यांतच त्यात दोन हजार कोटींची घट झाल्याचे दिसून आले आहे.
सामाजिक कार्यकर्ते गॉडफ्रे पिमेंटा यांनी माहिती अधिकारात पालिकेकडे गेल्या काही वर्षांतील मुदत ठेवींचा तपशील मागितला होता. पालिकेच्या विविध विभागांच्या अधिशेष रकमेच्या मुदत ठेवी विविध बँकांमध्ये असतात. विविध बँकांचे व्याजदर मागवून सर्वाधिक व्याजदर देणाऱ्या बँकांमध्ये या ठेवी गुंतवल्या आहेत. ७९ हजार कोटींच्या मुदत ठेवींपैकी ३९ हजार ५४३ कोटींची रक्कम पीएफ, निवृत्ती वेतन, उपदान, विशेष निधी आदींसाठी वापरणे बंधनकारक असते.
...म्हणून मुदत ठेवींमध्ये झाली घसरण
पालिकेने गेल्या काही वर्षांत पायाभूत सुविधांचे मोठे प्रकल्प हाती घेतले आहेत. या प्रकल्पांचे नियोजन आणि अंमलबजावणीमुळे या मुदतठेवी झपाट्याने कमी होऊ लागल्या आहेत. दरम्यान मुदत ठेवीची रक्कम मुंबईच्या पायाभूत सुविधांसाठीच वापरली जाते, असे अर्थसंकल्प मांडताना आयुक्त भूषण गगराणी यांनी स्पष्ट केले होते. सागरी किनारा प्रकल्प, गोरेगाव-मुलुंड जोडरस्ता, मलनिस्सारण प्रकल्प असे मोठ्या खर्चाचे आणि दीर्घकाळ चालणारे प्रकल्प यांच्यासाठी मुदत ठेवींमधील राखीव निधीशी संलग्न करण्यात आला आहे. त्यामुळे या प्रकल्पांची देणी देताना मुदत ठेवी कमी होत जातात. पालिकेने गेल्या काही वर्षांपासून राखीव निधी वापरण्यास सुरुवात केली आहे.
कोणत्या बँकांत जास्त गुंतवणूक?
स्टेट बँक ऑफ इंडिया: ४०,५७९.७० कोटी रुपये
एचडीएफसी बँक : २१,९८२.३० कोटी रुपये
आयसीआयसीआय बँक २१,९८८.२५ कोटी रुपये
युनियन बँक ऑफ इंडिया १२,५२८.०० कोटी रुपये